Pune District : माउलींच्या आषाढी पायी वारीची सांगता

परतवारी उत्साहात : पहाटे रंगला संतांच्या भेटीचा सोहळा
आळंदी – सुमारे महिनाभराचा पायी प्रवास, आळंदी ते पंढरपूर व पंढरपूर ते आळंदी करत आळंदीत दाखल झालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याची सोमवारी कामिका एकादशीला पालखी नगरप्रदक्षिणेने सांगता झाली. यंदाच्या सोहळ्यात लाखो वैष्णवांचा मेळा संपूर्ण महिनाभर वारीत रममाण झाला. आळंदीत नगरप्रदक्षिणा पार पडल्यानंतर वारकर्यांनी आता परतीची वाट धरली आहे.
पहाटे दैनंदिन पूजा विधी झाल्यानंतर भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात आले होते. कामिका एकादशी निमित्त राज्यभरातून दाखल झालेले भाविक, पालखी सोहळ्यासोबत पंढरपूरवरून आळंदीत दाखल झालेले वारकरी यामुळे आळंदी गजबजून गेली होती. दुपारी एकच्या सुमारास माउलींची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी देऊळवाड्यातून बाहेर पडली. महाद्वार, इंद्रायणी घाट, प्रदक्षिणा रस्तामार्गे पालखी वडगाव चौक येथून हजेरी मारुती मंदिरात विसावली.
यावेळी नाईकांच्या, कुर्हाडेंच्या वतीने मानाच्या दिंड्या विणेकरी, मानकर्यांना नारळ प्रसाद वाटप करण्यात आले. दिंड्यांच्या हजेरीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर पालखी सायंकाळी मंदिरात दाखल झाली. मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर देऊळवाड्यात संस्थानच्या वतीने मानकर्यांना, सेवकर्यांना नारळ प्रसाद वाटप करण्यात आले. दरम्यान, पायीवारी पालखी सोहळा आणि परतवारी उत्साहात पार पडल्यानंतर वारकर्यांनी सायंकाळी परतीची वाट धरली. यामुळे बसस्थानक, एसटी थांबा, खासगी प्रवासी वाहतूक आदी ठिकाणी वारकर्यांनी गर्दी केली होती.
17 वर्षांनंतर संतांची ऐतिहासिक भेट-
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या 750 व्या जन्मवर्ष आणि संत तुकाराम महाराजांच्या 375 व्या वैकुंठगमन वर्षानिमित्त तुकोबारायांची पालखी रविवारी (दि. 20) आळंदीत आली होती. सोमवारी (दि. 21) पहाटे 5.30 वाजता आळंदी नगरीत अभूतपूर्व असा संतभेट सोहळा पार पडला. तब्बल 17 वर्षांनंतर संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची भेट घडल्याने आळंदी नगरीत भक्तीभावाचा महासागर लोटला होता. संत तुकाराम महाराज पालखीसोहळा प्रमुख गणेश महाराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली तुकोबारायांच्या पादुका ज्ञानेश्वर माउलींच्या समाधीपुढे आणण्यात आल्या. यावेळी आळंदी देवस्थानच्या वतीने त्यांची विधीवत पूजा करण्यात आली.
भाविकांनी संतभेटीचा हा पवित्र क्षण याची देह, याची डोळा अनुभवला. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, सोहळा प्रमुख डॉ.भावार्थ देखणे, अॅड. राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज कबीर, पुरुषोत्तम महाराज पाटील, व्यवस्थापक माऊली वीर तसेच देहु संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे व विश्वस्त मंडळ उपस्थित होते. या ऐतिहासिक संतभेट सोहळ्यानंतर संत तुकाराम महाराजांची पालखीने देहूकडे प्रस्थान केले.





