Shankar Mandekar : “हा भाग पुन्हा ‘राष्ट्रवादीमय’ होणार!”- आमदार शंकर मांडेकरांचा विरोधकांना थेट इशारा
Shankar Mandekar : कासारसाई ते हिंजवडी... राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात मांडेकरांचा दौरा; सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन.

Shankar Mandekar – कासारसाई, नेरे, जांबे, मारुंजी आणि हिंजवडी हा परिसर नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांशी बांधील राहिला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर हा संपूर्ण परिसर पुन्हा एकदा राष्ट्रवादीमय होईल, असा ठाम विश्वास भोर-मुळशी-राजगडचे आमदार शंकर मांडेकर यांनी व्यक्त केला.
हिंजवडी आयटी परिसरातील विविध गावांना आमदार मांडेकर यांनी भेटी दिल्या. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी आमदार मांडेकर यांनी हिंजवडी-माण जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सागर साखरे आणि पंचायत समितीच्या उमेदवार निकिता वाघमारे यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांना जिद्दीने काम करण्याचे आवाहन केले.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनामुळे पक्षात दुःखाचे सावट असले, तरी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जिद्दीने उभा आहे. दादांना विजयी श्रद्धांजली अर्पण करणे आणि त्यांचा विकासाचा वारसा पुढे नेणे हीच आपली प्राथमिकता आहे. मतदारसंघाला निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही मांडेकर यांनी दिली.
कासारसाई, नेरे आणि जांबे भागातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. हिंजवडी हिल्स, लाइफ रिपब्लिक आणि मारुंजी परिसरातील आयटी हबमधील रहिवाशांशी त्यांनी संवाद साधला.
तेथील पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी आणि नागरी सुविधांबाबत मांडलेल्या प्रश्नांवर त्यांनी आश्वासक उत्तरे दिली. या दौऱ्यात मुळशी तालुक्यातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, पक्षाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.





