Shankar Mandekar: भोर-कापुरव्होळ रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करा; आमदार शंकर मांडेकर आक्रमक
Shankar Mandekar: भोंगवली येथील प्रस्तावित वीज प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; शेतकऱ्यांच्या हक्कासाठी चौकशी करण्याची आमदार मांडेकरांची सभागृहात मागणी.

Shankar Mandekar – भोर तालुक्यातील भोर-कापुरव्होळ-मांढरदेवी या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून, कोट्यवधी रुपये खर्च करूनही काही महिन्यांतच रस्ता उखडला आहे. या कामाला जबाबदार कोण? याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, अशी आक्रमक भूमिका भोरचे आमदार शंकर मांडेकर यांनी विधानसभा सभागृहात घेतली. तसेच भोंगवली येथील वीज प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असल्याने त्याबाबतही चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
विधानसभेत बोलताना आमदार मांडेकर म्हणाले, “हा रस्ता जनतेच्या विकासाचा नव्हे, तर चिंतेचा विषय ठरला आहे. नवीन काम होऊनही रस्ता उखडल्याने अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यात निष्पाप नागरिक जखमी होत असून काहींना जीवही गमवावा लागला आहे. या निकृष्ट कामामुळे स्थानिक नागरिक आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.” मांढरदेवी हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून या रस्त्यावरून दररोज शेतकरी व विद्यार्थीही मोठ्या संख्येने प्रवास करतात.
या रस्त्यावरील भोर ते मांढरदेवी दरम्यानचा ४ किलोमीटरचा रस्ता वनविभागाच्या हद्दीत असल्याने तिथे काम रखडले आहे. जनतेच्या करातून जमा झालेला पैसा अशा प्रकारे निकृष्ट कामांवर खर्च होणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे या रस्त्याची जबाबदारी निश्चित करून उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी मांडेकर यांनी लावून धरली. त्यांच्या या भूमिकेमुळे भोर तालुक्यातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
दोषी ठेकेदाराला काळ्या यादीत टाका!
विधानसभेतील अधिवेशनानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार मांडेकर यांनी थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले. “कोट्यवधींचा निधी खर्च करूनही रस्ते टिकत नसतील तर यात नक्कीच मोठा भ्रष्टाचार आहे. ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले असून, कामाची गुणवत्ता तपासणारे अधिकारी नेमके काय करत होते? असा सवाल त्यांनी केला. या कामात ठेकेदार दोषी आढळल्यास त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी आपण सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.




