प्रभात वृत्तसेवा भोर – भोर-मांढरदेवी-सुरुर या रस्त्याचे काँक्रिटीकरण व रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे, परंतु भोर-मांढरदेवी दरम्यान दोन ठिकाणी काही अंतरासाठी वनविभागाने हरकत घेतल्याने रस्त्याचे काम रखडले आहे. या दोन्ही ठिकाणचा रस्ता पूर्ण होण्यासाठी वनविभागाने शासनाकडे परवानगी मागितली आहे. शासनाकडून परवानगी आल्यानंतर रखडलेले काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे भोर शाखा उपअभियंता योगेश मेटेकर यांनी दिली.मांढरदेवी काळुबाईची यात्रा पौष महिन्यातील शाकंभरी पौर्णिमेला (२ जानेवारी २०२६) सुरू होत आहे. पुण्यावरून भोरमार्गे मांढरदेव घाटाने ये-जा करणे भाविकांना सोपे असल्याने या मार्गावरून भाविकांच्या वाहनांची रिघ असते. कापूरहोळ-भोर-मांढरदेवी-सुरुर या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असून वनखात्याने घेतलेल्या हरकतीमुळे निळकंठ, गोकवडी हद्दीतील तर आंबाडे गावच्या मांढरदेवी घाटातील म्हसोबाचा पेढा ते कणीचा ओहळ अंतरावरील रस्त्याचे काम बंद असून या दोन्ही ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तसेच, महावितरण, अतिक्रमण विभाग यांच्या हरकतीमुळे ठराविक ठिकाणी कामे अर्धवट राहिलेली आहेत. “मांढरदेवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या हद्दीतील रस्त्याची तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी आठ दिवसांत सुरू होणार आहे. तसेच मांढरदेवी घाटातील दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर, रंगरंगोटी अशी कामे लवकरच पूर्ण करून रस्ता सुरळीत सुरू होईल.” -योगेश मेटेकर, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग भोर शाखा