Shahu Kalamandir: ऐतिहासिक शाहू कलामंदिराची ‘तीसरी घंटा’ किमान महिनाभर बंद ; नेमकं कारण काय?
Shahu Kalamandir: ध्वनी आणि प्रकाश योजनेसाठी पुन्हा नव्या निविदेची तयारी; आधुनिक आसनव्यवस्था आणि नवीन नाट्यगृहाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याची रंगकर्मींची मागणी.

Shahu Kalamandir – शहरातील ऐतिहासिक शाहू कलामंदिर एक महिन्यासाठी दुरुस्तीसाठी बंद करण्यात आले असले, तरी यानिमित्ताने समोर आलेला सर्वात गंभीर प्रश्न म्हणजे ध्वनी व प्रकाश संयोजकांची कायमस्वरूपी पदे रिक्त असणे हा आहे. नाट्यप्रयोगाच्या यशामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारी ही दोन्ही पदे तांत्रिक स्वरूपाची असूनही ती कायमस्वरूपी भरली जात नसल्याने रंगकर्मींमध्ये तीव्र नाराजी आहे.
ध्वनी संयोजकाचे काम केवळ माइक चालविणे नसून संवाद शेवटच्या रांगेतील प्रेक्षकांपर्यंत स्पष्ट पोहोचवणे, इको नियंत्रित ठेवणे, ध्वनीची गुणवत्ता, संतुलन आणि सुश्राव्यता कायम राखणे अशी अत्यंत तांत्रिक जबाबदारी त्याच्यावर असते. त्याचप्रमाणे प्रकाश संयोजकही नाट्यप्रयोगातील प्रकाशयोजनेचे तांत्रिक नियोजन करत असल्याने ही दोन्ही पदे तांत्रिक संवर्गातील असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
शाहू कलामंदिरातील ध्वनी व्यवस्था, प्रकाश व्यवस्था आणि इतर दुरुस्तींसाठी सभागृह महिनाभर बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ‘नाटकाची तिसरी घंटा’ आता किमान महिनाभर तरी वाजणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी रंगकर्मींच्या तक्रारींची गंभीर दखल घेत तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले आहेत. बांधकाम विभागाकडून प्रस्ताव नगराध्यक्षांकडे सादर होणार असून त्यानंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
दरम्यान, ध्वनी व प्रकाश संयोजकांसाठी पुन्हा नव्याने निविदा काढण्याची तयारी सुरु असून, एकूण दुरुस्तीचा खर्च सुमारे ७५ ते ८० लाख रुपये राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. रंगकर्मींची भूमिका स्पष्ट आहे. किरकोळ डागडुजी करुन प्रश्न टाळण्यापेक्षा सर्व सुविधा, आधुनिक ध्वनी-प्रकाश व्यवस्था आणि दर्जेदार आसनव्यवस्था एकदाच उपलब्ध करून द्यावी. तसेच वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून नवीन नाट्यगृह उभारण्याचा प्रस्तावही शासनाकडे पाठविण्याची मागणी होत आहे.





