PMC News: सात कोटींचं काम थेट २० कोटींवर! कोथरूडच्या बालनाट्यगृहाचा अजब कारभार; ११ वर्षे झाली तरी काम संपेना
PMC News: नुकत्याच एसी बसवण्याच्या निविदा जाहीर, आता अंतर्गत सजावटीचा खर्च; ११ ते १२ वर्षांत प्रकल्पाचा खर्च तब्बल तिपटीने वाढल्याने पुणेकरांमधून संताप.

PMC News – एक तप संपायला आले तरी कोथरूडच्या बाळासाहेब ठाकरे कलादालनचे बांधकामाचे काम संपता संपेना, अशी स्थिती झाली आहे. नुकतेच येथील कलादालनात एसी बसवण्याच्या निविदा जाहीर झाल्या तर बालनाट्यगृहात ६८ लाख रुपयांचे म्युरल काम करण्याला गुरूवारी स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. सात कोटी रुपयांचे काम ११ ते १२ वर्षांत २० कोटी रुपयांपर्यंत गेले आहे.
कोथरूड येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बालनाट्यगृहात म्युरल (भित्तीचित्र) विषयक कामे करण्यासाठी सुमारे ६८.९५ लाख रुपयांच्या खर्चाच्या प्रस्तावाला गुरूवारी स्थायी समितीत मंजुरी दिली. या मंजुरीमुळे बालनाट्यगृहातील म्युरल आणि कलात्मक सजावटीची कामे वेगाने पूर्ण केली जाणार आहेत. या माध्यमातून बालनाट्यगृहाच्या अंतर्गत सौंदर्यात भर पडण्याबरोबरच सांस्कृतिक वास्तूचे आकर्षण वाढवण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे,
असा दावा भिमाले यांनी पत्रकार परिषदेत केला. प्रत्यक्षात गेल्या ११ ते १२ वर्षांपासून या कलादालनाचे काम सुरू आहे. एवढ्या वर्षांत हे काम संपता संपत नाही, अशी स्थिती असून, हे काम संपून हे नाट्यगृह, बालनाट्यगृह, कलादालन कधी सुरू होईल, याची वाट प्रेक्षक आणि कलाकार पाहत आहेत.
कामाची पाहणी करू : भिमाले
एवढ्या वर्षांत हे काम कसे काय पूर्ण झाले नाही, दिरंगाई का झाली, या कामासाठी किती खर्च झाला, कुठेपर्यंत काम पूर्ण झाले या सगळ्याची माहिती प्रत्यक्ष पाहणी करून घेतली जाईल, असे स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.:


