Nalasopara Crime : बापाकडून पोटच्या 3 मुलींवर लैंगिक अत्याचार; एका मुलीचा 4 वेळा केला गर्भपात

मुंबई : नालासोपाऱ्यातून संतापजनक घटना समोर आली आहे. बापानेच आपल्या 3 मुलींवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात मोठ्या मुलीचा 4 वेळा गर्भपात केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या तिन्ही मुलींनी नालासोपारा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. आरोपीवर खंडणी, गोळीबार तसेच हत्या प्रकरणी तक्रार दाखल असल्याचे माहिती समोर आली आहे. यातील दोन मुली या अल्पवयीन असल्याची माहिती आहे.
वडीलांनी अत्याचार केल्याची तक्रार दिलेल्या मुलीचे मुळ गाव कोकणात आहे. आई-वडीलांसह 5 बहीणी कोकणात राहत होत्या. मात्र, वडीलांकडून मुलींवर वारंवार अत्याचार होत होता. यातून मोठ्या 21 वर्षींय मुलीचा 4 वेळा गर्भपातदेखील करण्यात आला. वडीलांकडून वारंवार मुलींवर होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून 5 मुलींसह तिची आई नालासोपाऱ्यात आपल्या एका नातेवाईकांकडे राहण्यासाठी आली.
यानंतर हिंमत करत 21 वर्षींय मुलीने वडीलांविरोधात अत्याचार केल्याची तक्रार नालासोपारा पोलिस ठाण्यात दिली. यानंतर पोलिसांनी आरोपी बापाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तिच्या दोन अल्पवयीन बहीणींवरही अत्याचार करण्यात आला आहे. नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेने नालासोपारा परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.





