Australian women cricketers harassed : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2025 साठी भारतात आलेल्या ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघातील दोन प्रसिद्ध खेळाडूंसोबत एका अज्ञात दुचाकीस्वाराने गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना इंदोरच्या खजराणा रोडवर गुरुवारी (23 ऑक्टोबर 2025) सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे भारतीय आणि ऑस्ट्रेलियन अधिकारी हादरले असून, पोलिसांनी शुक्रवारी (24 ऑक्टोबर 2025) याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. नेमकं काय घडलं? हॉटेल रेडिसन ब्लू येथून खजराणा रोडवरील ‘द नेबरहूड’ कॅफेमध्ये जात असताना, पांढरा शर्ट आणि काळी टोपी घातलेला एका दुचाकीस्वाराने या दोन खेळाडूंचा पाठलाग केला. यानंतर त्याने वेगाने जवळ येऊन एका खेळाडूला अयोग्यरित्या स्पर्श केला. या घटनेने घाबरलेल्या खेळाडूंनी तात्काळ ऑस्ट्रेलियन संघाचे सुरक्षा अधिकारी डॅनी सिमन्स यांच्याशी संपर्क साधला. यावेळी जवळच असलेल्या एका कारमधील व्यक्तीने या खेळाडूंना धीर दिला आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी नोंदवला एफआयआर – या घटनेमुळे पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. डॅनी सिमन्स यांच्या तक्रारीवरून एमआयजी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली एफआयआर नोंदवला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. हेही वाचा – IND vs AUS : मॅथ्यू शॉर्टने गोळीच्या वेगाने मारला शॉट, पण मध्ये आला विराट, मागे झुकत घेतला जबरदस्त कॅच, पाहा VIDEO सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित – आंतरराष्ट्रीय स्पर्धेदरम्यान परदेशी खेळाडूंसोबत घडलेल्या या घटनेने सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ऑस्ट्रेलियन संघाने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, खेळाडूंच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी स्थानिकांना सतर्क राहण्याचे आणि संशयास्पद व्यक्तींबाबत तात्काळ माहिती देण्याचे आवाहन केले आहे.