Gujarat Rain News: गुजरातमध्ये अनेक ठिकाणी गंभीर पूरस्थिती; एनडीआरएफची पथके तैनात

Gujarat Rain News – मुसळधार पावसामुळे गुजरातच्या नवसारी जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणी तुंबून गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील लोकांना बाहेर काढण्याचे काम राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला देण्यात आले आहे. एनडीआरएफने नवसारीतील जलमय भागात अडकलेल्या लोकांना बाहेर काढले असून अजूनही बचावकार्य सुरू आहे.
नवसारीच्या मिथिला नगरी येथील पूरग्रस्त भागातून या पथकाने एक बालक आणि एका आजारी महिलेसह पाच जणांची सुटका केली. येथून किमान 30 जणांची सुटका करण्यात आली आहे.
महापुरासारख्या परिस्थितीत नवसारी नगरपालिकेने शहरातील पूरग्रस्त भागात अडकलेल्या लोकांसाठी २० हजार अन्नाची पाकिटे तयार केली आहेत. नवसारी नगरपालिकेच्या प्रमुख मीनल देसाई म्हणाल्या, आम्ही सकाळपासून अन्नाची पाकिटे तयार करत आहोत.
सकाळी २० हजार खाद्यपदार्थांची पाकिटे तयार केली आणि आता आणखी २० हजार खाद्यपदार्थांची पाकिटेही तयार केली जात आहेत. ही पाकिटे पूरग्रस्त भागात पाठवली जाणार आहेत.
पावसाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी क्षिप्रा एस आग्रे यांनी आज पाऊसग्रस्तांसाठी उभारलेल्या निवारागृहांची पाहणी केली. आग्रे म्हणाल्या ११० लोकांची सुटका करण्यात आली आहे आणि त्यांना येथील निवारागृहात हलवण्यात आले आहे.
महानगरपालिका, पोलिस आणि प्रशासन एकत्र काम करत आहेत आणि लोकांना खबरदारी म्हणून निवारागृहात स्थलांतरित होण्याचे आवाहन करत आहेत. शुक्रवारी गुजरातचे आरोग्य मंत्री हृषिकेश पटेल यांनीही आनंद जिल्ह्यातील बोरसस भागातील पूरग्रस्त भागांना भेट दिली.
मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी तुंबले आहे. जिथे जिथे कचरा पसरला आहे, तिथे जलजन्य आजार पसरू नयेत, यासाठी डॉक्टरांसह आरोग्य टीम तिथे तैनात करण्यात आली आहे,असे ते म्हणाले.
गुजरातच्या विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे, ज्यामुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे आठ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांची संख्या एकूण संख्या ६१ वर पोहोचली आहे.
तत्पूर्वी, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे आकलन करण्यासाठी सौराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांतील विशेषत: जामनगर आणि देवभूमी द्वारकामधील गावांची हवाई पहाणी केली.





