Bhor : त्रिपुरी पौर्णिमेला मंदिर परिसर दीपोत्सवाने उजळला; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
Bhor : त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त भोरमधील भोरेश्वर, रामेश्वर मंदिर आणि राजवाडा परिसर दिव्यांच्या रोषणाईने उजळला. महाआरतीसह दीपोत्सवात भाविकांचा मोठा सहभाग.

Bhor : त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त भोर शहरातील श्री भोरेश्वर आणि रामेश्वर मंदिर परिसर दिव्यांच्या आकर्षक रोषणाईने उजळून निघाला. तसेच राजवाडा परिसरातील सरकारी मारुती मंदिर आणि कारंजे येथेही दिव्यांची सुंदर सजावट करण्यात आली होती. या रोषणाईमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. मंदिरांमधील सजावट आणि महाआरतीचा सोहळा पाहण्यासाठी सायंकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
भोरेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. यावेळी मंदिरात भक्तिमय वातावरणात महाआरती झाली. या आरतीसाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. त्रिपुरी पौर्णिमेची परंपरा जपत महिलांनी पारंपरिक पद्धतीने त्रिपुराच्या वाती प्रज्वलित केल्या.
या उत्सवाचे नियोजन शिवशंभो ग्रुप, भोरेश्वर मंदिर ट्रस्ट आणि राजवाडा चौक मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते. या सोहळ्यात महिला, पुरुष आणि लहान मुलांसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
मंदिरांमधील दिव्यांची रोषणाई, फुलांची सजावट आणि महाआरतीचा अनुभव घेण्यासाठी भोर शहरासह परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त भोर शहरात सर्वत्र धार्मिक उत्साह पाहायला मिळाला.





