Satara News : सातारा डॉक्टर महिला मृत्यू प्रकरणात खळबळजनक ट्विस्ट, हातावरील हस्ताक्षराबाबत अंधारेंचा मोठा दावा

मुंबई : साताऱ्यातील डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणात सतत नवे खुलासे होत असून, ठाकरे गटाच्या महिला नेत्या सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप करीत प्रकरणाचा गुंता अधिकच वाढवला आहे. पीडितेच्या हातावर आणि सुसाइड नोटमधील हस्ताक्षर जुळत नसल्याचा दावा अंधारे यांनी केला असून, हा आत्महत्येचा की हत्येचा प्रकार आहे, असा सवाल उपस्थित केला आहे.
नवी मुंबईतील पोलीस अधिकारी अश्विनी बिंद्रे हत्याकांडाचा दाखला देत अंधारे यांनी सातारा प्रकरणातील तफावत अधोरेखित केली. पीडितेच्या हातावर पोलीस निरीक्षकाने लिहिलेल्या ‘निरीक्षक’ शब्दात पहिली वेलांटी आहे, तर सुसाइड नोटमध्ये हाच शब्द नऊ वेळा लिहिला असून त्याला दुसरी वेलांटी देण्यात आली आहे, असा दावा त्यांनी करीत दोन्ही हस्ताक्षरांचे फोटोही दाखवले.
५० कोटींच्या मानहानी नोटीशीबाबत अंधारे म्हणाल्या, ‘मला पुण्यातून ५० कोटींच्या दाव्याची नोटीस आली आहे. मी महिला आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. घटनेनंतर घटनास्थळावरील मुद्देमाल, लॅपटॉप आणि फोन जप्त केले जातात. ही माहिती गोपनीय असते आणि कोर्टाच्या परवानगीने सादर करावी लागते. आम्ही या प्रकरणातील सीडीआरची मागणी करतो आहोत.’
याशिवाय, सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. चाकणकर यांची प्रतिक्रिया काय असेल, याकडे लक्ष लागले आहे.





