Phaltan Doctor Death Case : फलटण येथील डॉक्टर महिलेच्या रहस्यमय मृत्यू प्रकरणात शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार, महिलेचा मृत्यू हा गळफास घेतल्यानेच झाला असून, तिच्या शरीरावर इतर कोणत्याही जखमा किंवा आघाताच्या खुणा आढळल्या नाहीत. मात्र, मृत महिलेच्या आई-वडिलांनी आपल्या मुलीची थेट हत्या झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणीही केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रशांत बनकर आणि पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांच्याशी मृत महिलेचा काही संवाद झाला होता का, याची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी सीडीआर मागवला होता. हा अहवाल पोलिसांच्या हाती आला असून, त्यात पीएसआय गोपाळ बदनेसोबत महिलेचा संवाद झाल्याचे निष्पन्न झाले आहे. बदने हा आरोपी पोलिसांना शरण आला असला, तरी त्याने आपला मोबाईल फोन पोलिसांकडे जमा केलेला नाही. यामुळे तपासात आणखी अडथळे येऊ शकतात. दरम्यान, हे प्रकरण आता राजकीय वळण घेत असून, माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी थेट लिंक असल्याचा दावा ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन निंबाळकरांवर अनेक गंभीर आरोप केले. याशिवाय, निंबाळकरांविरोधात यापूर्वी नोंदवलेल्या तक्रारी आणि आरोपांचाही त्यांनी सविस्तर खुलासा केला. पोलिस तपासातून हळूहळू आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे. हे प्रकरण कुठे जाऊन थांबते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.