Vikas Lawande Post : शरद पवार गटाच्या नेत्याची खळबळजनक पोस्ट; अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी केला ‘हा’ मोठा दावा
Vikas Lawande Post : अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याने सोशल मीडियावरून पोस्टद्वारे खळबळजनक दावा केला आहे.

Vikas Lawande Post : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताला एक महिना पूर्ण झाला आहे. २८ जानेवारी २०२६ या दिवशी बारामतीला विमानाने जात असताना अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले.
या अपघातानंतर विविध शंका उपस्थित केल्या जात आहेत. आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, सातत्याने ते विविध प्रश्न उपस्थित करत आहेत. सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. यामुळे अपघाताचे गूढ दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. त्यातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याने एक खळबळ उडूवन देणारी पोस्ट सोशल मीडियावरून शेअर करत मोठा दावा केला आहे.
अजित दादांचा मर्डर झालाय, यावर माझं ठाम मत बनलंय. सदर प्रकरण दडपण्याचा उच्च पातळीवरुन प्रयत्न सुरु आहे, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ता आणि संघटक सचिव विकास लवांडे यांनी एक्सवरून ट्वीट करत केला आहे. कारण अजितदादा हे कुणाचा तरी मोठा राजकीय अडथळा बनलेले असावेत. इतिहास तपासला तर अनेक प्रकरणे दडपली आहेत हे लक्षात येईल. असेही ट्वीटमध्ये लवांडे यांनी म्हटले आहे.
शासनाची व चौकशी करणाऱ्या यंत्रणांची भूमिका पाहता आदरणीय अजितदादांचा सुनियोजित मर्डर झालेला आहे यावर माझे ठाम मत बनलेले आहे. सदर प्रकरण दडपण्याचा उच्च पातळीवरून प्रयत्न सुरू आहे.
कारण अजितदादा हे कुणाचा तरी मोठा राजकीय अडथळा बनलेले असावेत.
इतिहास तपासला तर अनेक प्रकरणे दडपली आहेत…— Vikas Lawande (@VikasLawande1) March 4, 2026
विकास लवांडे यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सध्या विमान अपघात प्रकरणी केंद्र व राज्यस्तरावर चौकशी केली जात आहे. अपघाताचा प्राथमिक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
नुकतीच आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत २२ पानांचा अपघाताविषयी जो अहवाल एएआयबीकडून प्रसिद्ध करण्यात आला. त्यावर नाराजी व्यक्त करत अनेक गंभीर आरोप केले आहेत. या सगळ्यात विकास लवांडे यांनी थेट राजकीय अडथळा दूर करण्यासाठी घातपात घडवून आणण्याचा आरोप केल्याने प्रकरण आणखी तापणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.




