Jay Pawar – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत जी माहिती मला मिळाली, त्यापैकी बरचीशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दरम्यानच्या कालावधीत जाहीर केली आहे. त्यामुळे याबाबत अंतिम अहवाल आपल्यावर मी निश्चित या विषयावर बोलणार आहे, अशी प्रतिक्रिया युवा नेते जय पवार यांनी दिली. बारामती तालुक्यात पणदरे परिसरात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी जय पवार हे आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जय पवार यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणूक, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर, पवार कुटुंबीयातील एकोपा आदींवर भाष्य करीत त्यांनी अनेक सूचक संकेत दिले आहेत. जय पवार म्हणाले, अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेतील अंतिम अहवाल येत नाही, तोपर्यंत मी उगीचच लोकांच्या मनात मतभेद करायला नाही पाहिजे. जे आम्हाला वैयक्तिक वाटतं ते वाटतं, पण जेव्हा अंतिम अहवाल येईल, त्यावेळी सर्वांसमोर स्पष्टता देईल, असे सांगून त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे. जय पवार म्हणाले, बारामती विधानसभा पोटनिवडणूक पूर्णतः भावनिक आहे. अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर अद्याप बारामतीकर दुःखातून सावरले नाहीत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, हे शरद पवार यांच्यापासून सर्वांना वाटत आहे. काँग्रेसकडून उमेदवारी देण्याबाबत वेगवेगळी वक्तव्ये येत आहेत, हे खरे आहे. तरीही बिनविरोधसाठी आम्ही विविध पक्षांच्या नेते मंडळींना विनंती करणार आहे. सोमवारी (दि.६) रोजी सुनेत्रा पवार यांचा अर्ज दाखल केला जाणार आहे. यावेळी महायुतीमधील नेते, मंत्र्यांना निमंत्रित केले आहे. आम्ही पवार कुटुंबीय म्हणून एकच दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलिनीकरणावर जय पवार म्हणाले, मी लहान आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, ज्येष्ठ नेते ठरवतील. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा विषय हा वरिष्ठ पातळीवरचा आणि राजकारणाचा भाग आहे. त्यावर मी जास्त संभाषण करणे मला योग्य वाटत नाही. राहिला प्रश्न पवार कुटुंबीयांचा. आम्ही सर्वजण पवार कुटुंब म्हणून एकच आहोत, असे सांगून जय पवार यांनी विलिनीकरणाच्या प्रश्नाला बगल दिली.