Ratnagiri News : रत्नागिरीत खळबळ! लाच घेताना स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर ACBच्या जाळ्यात
Ratnagiri News : या कारवाईमुळे जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याविरोधातील या कारवाईची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कांचन शिरीष मदार यांना 4,500 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याविरोधातील या कारवाईची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला गर्भवती असून त्यांना गर्भपात करावयाचा होता. यासाठी त्यांनी 3 जून रोजी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. कांचन मदार यांची भेट घेतली. यावेळी गर्भपातासाठी लागणारे औषधांचे किट देण्यासाठी डॉ. मदार यांनी 4 ते 5 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
तक्रारदार महिलेने तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर डॉ. मदार यांनी 4,500 रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. ACBच्या पथकाने सापळा रचत त्यांना अटक केली.
हेही वाचा : Pune Water Cut : पुणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील आठवड्यापासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा?
ठरल्याप्रमाणे तक्रारदार महिलेकडून डॉ. मदार यांनी त्यांच्या ‘एमएच 08 एएक्स 2618’ या खाजगी चारचाकी वाहनात 4,500 रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारली. लाच स्वीकारताच ACBच्या अधिकाऱ्यांनी पंचांसमक्ष त्यांना ताब्यात घेतले.
डॉ. कांचन शिरीष मदार (वय 48, रा. चिपळूण, मूळ रा. पागमळा) असे अटक करण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव असून, त्यांच्याविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे आणि सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी ACBचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांच्या पथकाने केली.
दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ACBतर्फे करण्यात आले आहे.
डॉक्टर कांचन मदार हे वैद्यकीय क्षेत्रातील रत्नागिरी जिल्ह्यातलं मोठं नाव आहे. शुल्लक रकमेची लाच घेताना अटक झाल्याच्या वृत्तानंतर जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे.





