Vikram Kakade : कोण आहेत विक्रम काकडे? उमेदवारी कशी मिळाली? पडद्यामागच्या राजकारणाची चर्चा
Vikram Kakade : विक्रम काकडे यांना उमेदवारी मिळाल्याने पक्षातील अनेक पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा आहे. आर्थिक ताकद आणि वरिष्ठ संबंधांच्या आधारे उमेदवारी दिली गेल्याचा आरोप काही कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

Vikram Kakade : विधान परिषद निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये मोठा राजकीय तणाव पाहायला मिळाला आहे. उमेदवारी कोणाला द्यायची यावरून पक्षात अंतर्गत संघर्ष उफाळून आला असून बैठकीतच जोरदार घडामोडी घडल्या.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार आणि जय पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उमेदवारीवर चर्चा सुरू असताना अजित पवारांचे कट्टर समर्थक सुनील टिंगरे अचानक बैठकीतून बाहेर पडले. ते थेट पक्ष कार्यालयात जात असल्याचे सांगून निघून गेले.
यानंतर बैठकीतील घडामोडींना वेग आला आणि संजय काकडे व विक्रम काकडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर विक्रम काकडे यांना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली. महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ( Vikram Kakade)
दरम्यान, सुनील टिंगरे यांनीही बंडखोरी करत स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केल्याने पक्षातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. या घडामोडींनंतर त्यांच्या समर्थकांनी सामूहिक राजीनाम्याचा निर्णय घेतला असून काही कार्यकर्त्यांनी थेट माध्यम प्रतिनिधींना राजीनामे सुपूर्त करून नाराजी व्यक्त केली.
विक्रम काकडे यांना उमेदवारी मिळाल्याने पक्षातील अनेक पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा आहे. आर्थिक ताकद आणि वरिष्ठ संबंधांच्या आधारे उमेदवारी दिली गेल्याचा आरोप काही कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. माजी आमदार विलास लांडे यांनीही यावर प्रतिक्रिया देताना, प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी मिळाली असती तर पक्ष अधिक मजबूत झाला असता, असे मत व्यक्त केले.
या वादाला आणखी एक राजकीय पार्श्वभूमी आहे. विक्रम काकडे यांचे सासरे माजी आमदार अनिल भोसले असून त्यांचा आणि अजित पवार यांच्यात पूर्वीपासूनच राजकीय संघर्ष राहिला आहे. 2017 मधील विधानपरिषद निवडणुकीपासून दोघांमध्ये मतभेद वाढले होते. त्यानंतर अनेक राजकीय घडामोडींमुळे हा संघर्ष अधिक तीव्र झाला.
राष्ट्रवादीत नाराजीचा सूर (Vikram Kakade)
18 जून रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या निवडणुकीत 17 पैकी 11 जागांवर भाजपने उमेदवार उभे केले असून महायुतीतील आणि विरोधी पक्षातील राजकीय समीकरणांमुळे स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे. मागील निवडणुकीपेक्षा यंदा भाजपने अधिक जागांवर आपली ताकद वाढवली आहे. या संपूर्ण घडामोडींमुळे पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्य नाराजी निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.
कोण आहेत विक्रम काकडे? (Vikram Kakade)

Vikram Kakade : कोण आहेत विक्रम काकडे? उमेदवारी कशी मिळाली? पडद्यामागच्या राजकारणाची चर्चा
- खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव.
- अजित पवारांचे निष्ठावंत कार्यकर्ता.
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू.
- उत्तम बांधकाम व्यावसायिक.
- 4 वर्ष स्टेट शुटींग चॅम्पियन, राष्ट्रीय पातळीवरील संघात देखील सहभाग.
- आंतरराष्ट्रीय पातळीवर इटली, फ्रान्स जर्मनी, थायलंड येथील थाय ओपन स्पर्धेतदेखील सहभाग.





