Madhav Gadgil Passes Away | ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी पुण्यातील डॉ. शिरीष प्रयाग हॉस्पिटल येथे 7 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता अखेरचा श्वास घेतला. आज सायंकाळी 4 वाजता त्यांच्यावर अंत्यसंकर करण्यात येणार आहेत. त्यांचे पार्थिव ‘पंचवटीतील पाषाण येथील ए-१८, स्प्रिंग फ्लॉवर अपार्टमेंट’ या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. पर्यावरण आणि परिसंस्था वाचवा असे अभ्यासपूर्णपणे सांगणारी व्यक्ती आपल्यातून निघून गेल्याने अनेकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. माधव गाडगीळ यांनी पर्यावरण संरक्षण आणि विकास यामध्ये समतोल साधण्याची भूमिका आयुष्यभर मांडली. पश्चिम घाट संवर्धनासाठी स्थापन करण्यात आलेल्या गाडगीळ समितीच्या अहवालामुळे देशभरात मोठी चर्चा झाली होती. त्यांचा पश्चिम घाटात अनेक वर्षे संशोधन करून एक अहवाल तयार केला होता. त्या संशोधनावर एक पुस्तक देखील प्रसिध्द झाले आहे. पश्चिम घाटातील पर्यावरणाचा प्रकल्पांमुळे होणारा ऱ्हास त्यांनी या अहवालात मांडला होता. डॉ. गाडगीळ यांनी आतापर्यंत ७ पुस्तके लिहिली असून, २२५ वैज्ञानिक संशोधनपर लेख आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिध्द झाले आहेत. कोण होते डॉ. माधव गाडगीळ? डॉ. माधव गाडगीळ हे भारतीय विज्ञान संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. अध्यापनासोबतच त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना पर्यावरण अभ्यास, संशोधन आणि संवर्धनाच्या कार्यासाठी प्रेरित केले. आज देशातील अनेक नामवंत पर्यावरण अभ्यासक हे त्यांचे शिष्य आहेत. डॉ. गाडगीळ हे पंतप्रधानांच्या सल्लागार समितीचे सदस्य होते. तसेच ‘पश्चिम घाट पर्यावरण तज्ज्ञ पॅनेल’चे अध्यक्ष म्हणून त्यांनी पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी वैज्ञानिक, समतोल आणि दूरदृष्टीपूर्ण धोरण मांडले. Madhav Gadgil Passes Away | पर्यावरण संरक्षण हे केवळ शासनाचे काम नसून लोकसहभागातूनच ते यशस्वी होऊ शकते, असा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यामुळे त्यांनी शेतकरी, आदिवासी, ग्रामस्थ आणि स्थानिक समुदायांशी संवाद साधून पर्यावरणीय जाणीव निर्माण केली. Madhav Gadgil Passes Away | अनेक पुरस्काराने सन्मानित आयुष्यभर पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेले ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ या सर्वोच्च पुरस्काराने २०२४ मध्ये सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय डॉ. गाडगीळ यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. गाडगीळ यांच्या निधनाने पर्यावरण आणि परिसंस्था संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न करणारी एक व्यक्ती हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. Madhav Gadgil Passes Away | हेही वाचा: भाजपमध्ये गेल्यानंतर संतोष धुरींचे गंभीर आरोप; ‘त्या’ दाव्यावर संदीप देशपांडेंची पहिली प्रतिक्रिया