नगरसेविका सीमा सावळे यांची भाजपमधून हकालपट्टी

अमरावती मधील दर्यापूर विधानसभा मतदार संघात बंडखोरी
पिंपरी – पक्षादेश डावलून विधानसभा निवडणुकीत अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघातून भाजप उमेदवाराच्या विरोधातच बंडखोरी केलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका सीमा सावळे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील तीन नगरसेवक बंडखोरी करुन निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शिवसेना गटनेते राहुल कलाटे, भाजप नगरसेविका सीमा सावळे आणि भाजप नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपने ओव्हाळ यांची यापूर्वीच हकालपट्टी केली आहे. तर, कलाटे यांचा शिवसेनेशी काडीचाही संबंध नसल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. स्थायी समितीच्या माजी सभापती असलेल्या सीमा सावळे या अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. भाजपने तिथे विद्यमान आमदार रमेश बुंदिले यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे.
पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी केल्याने सावळे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. पूर्वाश्रमीच्या शिवसैनिक असलेल्या सावळे 2007 व 2012 या दोन पंचवार्षिकमध्ये शिवसेनेच्या तिकिटावर सलग दोन वेळा निवडून आल्या होत्या. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीवेळी त्यांनी भाजपचा झेंडा हातात घेतला.
भाजपच्या चिन्हावर त्या प्रभाग क्रमांक आठ, इंद्रायणीनगरमधून निवडून आल्या आहेत. भाजपची सत्ता येताच पहिल्या वर्षी त्यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्यात आले होते. पिंपरी विधानसभेसाठी त्या इच्छूक होत्या. मात्र, ही जागा महायुतीच्या जागा वाटपात शिवसेनाला गेली. पिंपरीत संधी नसल्याने सावळे यांनी दर्यापूर येथे बंडखोरी केली.





