Donald Trump – गेल्या महिन्यात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि आताच्या निवडणुकीतील एक उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यामुळे संपूर्ण जगभरात एकच खळबळ उडाली होती. या हल्ल्यात आपले प्राण वाचवल्याबद्दल आपल्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सिक्रेट सर्व्हिसची ट्रम्प यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. मात्र आता हत्येच्या या प्रयत्नांच्या संदर्भात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या बहुतांश जणांनी अमेरिकेच्या सिक्रेस सर्व्हिसच्या क्षमतेबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. १० पैकी ७ जणांनी ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यासाठी कुठेना कुठे सिक्रेट सर्व्हिसच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या सुरक्षेसाठी सिक्रेट सर्व्हिस बऱ्याच वर्षापासून कार्यरत आहे. आता असा प्रश्न उपस्थित होतो आहे की ट्रम्प यांच्या सुरक्षा कवचाच्या एवढ्या आतल्या भागात रायफलधारक हल्लेखोर पोहोचलाच कसा? एका इंग्रजी माध्यमाने दिलेल्या बातमीनुसार माजी संचालक किम्बर्ली चीटल यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्वेक्षणातील ही माहिती उघड झाली आहे. अमेरिकी कॉंग्रेसने गेल्या आठवड्यात किम्बर्ली यांची याच संदर्भात चौकशी केली होती. त्यावेळी त्यांनी जी उडवाउडवीची उत्तरे दिली आहे त्यामुळे अमेरिकी नागरिकांमधील असंतोष आणखीनच वाढला. तर आता एजन्सीचे नवे संचालक रोनाल्ड रोवे यांनी हल्ल्याच्या घटनेबाबत निराशा व्यक्त केली आहे. झालेल्या चुकीबद्दल आपल्याला लाज वाटत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. अमेरिकेतील अनेक लोकांचे असे मानणे आहे की हत्येचा प्रयत्न करण्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यातील सगळ्यांत मोठे कारण म्हणजे अमेरिकेतील सध्याची राजकीय स्थिती हे असू शकते. काही जणांनी दोष सिक्रेट सर्व्हिसच्या माथी मारला असला तरी इतर अनेक जण अमेरिकेतील फोफावलेली बंदुक संस्कृतीही याला कारणीभूत असल्याचे मानत आहेत. तरीही टक्केवारी ध्यानात घेता सिक्रेट सर्व्हिसला जबाबदार धरणाऱ्यांचीच संख्या अधिक आहे.