Pune : पुण्यात ‘वुमन हू बिल्ड’ उपक्रमाचा शुभारंभ; मुंबईतील कोळी महिलांच्या उद्योजकीय प्रवासावर चर्चा
Pune : ओळख आणि उद्योग एकत्र आल्यास बाजारपेठ साथ देते का? या विषयावर मान्यवरांचे मतमंथन

Pune : महिलांच्या उद्योजकतेसाठी संवादाचे व्यासपीठ निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘सीगल अॅडव्हर्टायझिंग’तर्फे ‘वुमन हू बिल्ड’ या नव्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. पुण्यातील पाषाण येथील पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या सभागृहात झालेल्या पहिल्या सत्रात ‘समुदायाची ओळख, कोळी उद्योजक आणि भारतातील महिला उद्योजकता’ या विषयावर चर्चा झाली. मुंबईतील कोळी समाजातील महिलांच्या उद्योजकीय प्रवासावर आधारित ‘कोळी कम्युनिटी ब्रँड बुक’ हा या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘दर्यावर्दी महिला संघा’च्या पुढाकारातून स्थापन झालेल्या ‘दर्यावर्दी प्रोड्युसर कंपनी लिमिटेड’ (डीपीसीएल)च्या महिला संचालकांचा विशेष सत्कार करण्यात आला. सीगल अॅडव्हर्टायझिंगचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक तसेच ‘कोळी कम्युनिटी ब्रँड बुक’चे लेखक समीर देसाई यांनी पुस्तकातील काही अंश वाचून दाखवत त्यामागील प्रवास उलगडून सांगितला.
‘वृत्ती’ संस्थेच्या ‘फिशमार्क’चे संचालक व्ही. विवेकानंदन यांनी प्रमुख व्याख्यानात भारतातील मत्स्यव्यवसायाशी निगडित समुदायांसाठी उभारलेल्या विविध संस्थात्मक उपक्रमांचा आढावा घेतला. त्यांनी चार दशकांहून अधिक काळातील अनुभवांच्या आधारे समुदायाधारित उद्योग उभारणीचे महत्त्व अधोरेखित केले.
‘ओळख उद्योगापूर्वी येते, तेव्हा बाजारपेठ त्याला प्रतिसाद देते का?’ या मुख्य विषयावर आयोजित परिसंवादात पर्सिस्टंट फाउंडेशन व देआसरा फाउंडेशनच्या अध्यक्षा सोनाली देशपांडे, सेवा बँकेच्या उपमहाव्यवस्थापक भूमिका जोशी, ‘लीडअप युनिव्हर्स’च्या सहसंस्थापक रश्मी मंडलोई, ‘सेंटर फॉर यूथ डेव्हलपमेंट अँड अॅक्टिव्हिटीज’ (सीवायडीए)चे संस्थापक मॅथ्यू मट्टम आणि ‘वृत्ती’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी राघिनी बी. यांनी सहभाग घेतला. या चर्चेचे सूत्रसंचालन समीर देसाई यांनी केले.
‘व्हॉइसेस फ्रॉम द कम्युनिटी’ या सत्रात दर्यावर्दी महिला संघाच्या संस्थापक उज्ज्वला पाटील यांनी महिलांच्या संघटनात्मक प्रवासाबद्दल मनोगत व्यक्त केले. डीपीसीएलच्या स्वयं-साहाय्य गटातील महिलांनीही आपले अनुभव मांडले. यानंतर कोळी महिलांनी ‘मी हाय कोळी’ हे गीत सादर करून आपल्या सांस्कृतिक अस्मितेचा अभिमान व्यक्त केला.
कार्यक्रमाचा समारोप ‘वृत्ती’च्या प्रकल्प प्रमुख सोनिया बेदी गर्चा यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या ‘कोळी सीफूड एक्स्पिरियन्स’मध्ये कोळी महिलांनी स्वतः तयार केलेले ताजे समुद्री खाद्यपदार्थ, लोणची, सुकामासे आणि विशेष कोळी मसाल्यांचा आस्वाद उपस्थितांना घेता आला.
यावेळी समीर देसाई म्हणाले, “आम्ही काही नवीन निर्माण केले नाही, तर आधीपासून अस्तित्वात असलेल्या वास्तवाला संघटित स्वरूप दिले. कोळी महिलांमध्ये उद्योजकतेची क्षमता आधीपासूनच होती. त्यांच्या ओळखीला व्यापक बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्यासाठी सक्षम व्यवस्था उभारण्याची गरज होती.”






