पुणे: शाळा सोडल्याचा दाखला आणि मार्कशीट देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीरपणे पैशांची मागणी करणाऱ्या शाळा आणि महाविद्यालयांविरुद्ध आता कडक पावले उचलली जाणार आहेत. शाळा सोडल्याचा दाखला आणि गुणपत्रिका देताना कोणतीही अवैध रक्कम आकारली जाऊ नये, असे स्पष्ट आदेश विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिले आहेत. पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक गणपत शंकरराव मोरे यांनी पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक व प्राचार्यांना यासंदर्भात लेखी पत्रक पाठवले आहे. आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी यासंदर्भात तक्रार अर्ज दाखल केला होता. शाळांमध्ये दाखले देताना विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याची तक्रार या अर्जाद्वारे शिक्षण विभागाकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत शिक्षण उपसंचालकांनी सर्व शैक्षणिक संस्थांना कडक सूचना दिल्या आहेत. शिक्षण संचालनालयाच्या ५ जून २०२५ च्या संदर्भानुसार, विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्रे देताना कोणत्याही प्रकारची अतिरिक्त फी आकारणे बेकायदेशीर आहे. या आदेशाचे उल्लंघन करून अवैध रक्कम घेतल्याचे निदर्शनास आल्यास किंवा त्याबाबत तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित संस्था आणि जबाबदार व्यक्तींवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशारा या पत्राद्वारे देण्यात आला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला असून शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार आहे.