SCERT Paper Leak: परीक्षा होण्याआधीच पेपर युट्युबवर: 2री ते 8वीच्या प्रश्नपत्रिकांचा धक्कादायक ‘लीक’प्रकार, शिक्षण विभागात खळबळ

पुणे – राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) मार्फत इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या पायाभूत चाचणीतील प्रश्नपत्रिका चक्क परीक्षा सुरू होण्याच्या आधीच युट्युबवर लीक झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या गंभीर प्रकाराची तक्रार विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.
एससीईआरटी सहायक संचालक संगिता प्रभाकर शिंदे (५०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, राज्यातील इयत्ता दुसरी ते आठवी या वर्गांच्या विद्यार्थ्यांसाठी ६ ऑगस्टपासून नियोजित चाचणीसाठी आवश्यक प्रश्नपत्रिका सर्व जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात आल्या होत्या. मात्र, बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास कार्यालयाच्या निदर्शनास आले की काही युट्युब चॅनेलवर चाचणीपूर्वीच पेपर अपलोड करण्यात आले आहेत.
तपासादरम्यान “कैलास सर मॅथ्स”, “म मराठी” आणि ” एसजे ट्युशन क्लासेस” या युट्युब चॅनेलवर इयत्ता सातवीच्या मराठी (दिनांक ६ ऑगस्टचा) तसेच गणित (दिनांक ७ ऑगस्टचा) प्रश्नपत्रिकांचे लिक झालेले व्हिडिओ सापडले आहेत. शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, हे पेपर अज्ञात इसमांकडून मिळवून परवानगीशिवाय सार्वजनिक करण्यात आले असून, यामुळे शासकीय आदेशाचे गंभीर उल्लंघन झाले आहे.
या प्रकारामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली असून, प्रश्नपत्रिका लीक झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. विश्रामबाग पोलीसांनी संबंधित युट्युब चॅनेल्सना नोटिसा पाठवून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अरुण घोडके करत आहेत.





