रूपगंध: सुसंस्कारित पिढी

संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे, असे एक सुभाषित आहे. बालवयातच मुलांवर सुसंस्कार करायला हवेत हे सांगण्यासाठी नुकत्याच अनुभविलेल्या कार्यक्रमाची गोष्ट.
गेल्या रविवारी खंडाळा पारगाव येथे सुवर्णकार समाज श्रावणी संघटनेतर्फे आयोजित केलेल्या सामुदायिक व्रतबंध सोहळ्यासाठी गेलो होतो. मी अध्यक्षस्थानी होतो. एका सुसज्ज मंगल कार्यालयात एकूण 33 मुलांच्या सामुदायिक मुंजी मोफत केल्या जाणार होत्या. आजच्या संघर्ष युगात नव्या पिढीवर योग्य वयात सुसंस्कार करणे गरजेचे आहे या हेतूने संयोजकांनी हा कार्यक्रम घेतला होता. संघटनेचे मी मनोमन कौतुक केले.
कार्यालय भव्य होते. बैठक व्यवस्था सुंदर होती. परिसर स्वच्छ होता. सकाळची वेळ आल्हाददायक होती. सर्वत्र सनई चौघड्याचे सूर निनादत होते. मधोमध असलेल्या प्रांगणात 33 बटू आणि त्यांच्या पालकांसाठी पूजेला बसण्याची शिस्तबद्ध व्यवस्था केली होती. करोनाच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीला अनुसरून सर्व सरकारी नियम पाळून बैठक व्यवस्थेत योग्य अंतर ठेवले होते.
वरच्या बाजूला मान्यवरांसाठी व्यासपीठ तयार केले होते. महाराष्ट्रातून सर्वदूर ठिकाणांवरून आलेल्या प्रतिष्ठितांची मांदियाळी हजर होती. अध्यक्षस्थानी मी स्थानापन्न झालो. मंत्रोच्चाराच्या गजरात समोर चाललेले पारंपरिक विधी पाहून मन आनंदून गेले.
पौरोहित्य करणारे नमो गुरुजी आणि त्यांचे दोन साथीदार सर्व बटूना व त्यांच्या पालकांना सूचना देत होते. बटूंचे चेहरे आनंदाने ओसंडून वाहताना दिसत होते. सकाळच्या रामप्रहरी सुरू झालेला सोहळा साधारणपणे पाच तास चालला होता. सुमुहुर्तावर कुर्यात बटोमंगलमच्या जयघोषात पुष्पाक्षदा टाकल्या गेल्या.
दुपारच्या सत्रात मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. नमो गुरुजीनी उपनयन संस्काराचे महत्त्व आणि गरज तसेच गायत्री मंत्राची महती यावर भाष्य केले. मुलांनी दररोज संध्याकाळी देवासमोर नतमस्तक होऊन “शुभंकरोती कल्याणम्’, “रामरक्षा’ “भीमरूपी महारुद्रा’ इत्यादींचे पठण केल्याने त्यांची स्मरणशक्ती कशी वाढते याविषयी समारंभासाठी उपस्थित असलेले विशेष अतिथी चाफळ येथील बाळकृष्ण बहुलेकर यांनी सविस्तर माहिती दिली. सर्व बटूंना “सुविचारांचे मोती’ हे माझे पुस्तक भिक्षावळीत भेट देण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात मी उपस्थितांना एक संस्कार कथा सांगितली. एका पाच वर्षांच्या मुलाला त्याच्या वडिलांनी वाढदिवसानिमित्त एक जगाचा नकाशा दिला होता. वडिलांनी दिलेली भेट न आवडल्याने त्या मुलाने नकाशाचे फाडून तुकडे केले. या प्रकाराने चिडलेले वडील त्याला शिक्षा करणार होते. त्या मुलाने नकाशा चिकटवून दाखविला तरच त्याला माफ करेल, असे ते म्हणाले.
मुलाने केवळ पाचच मिनिटात नकाशा चिकटवून दाखविला. त्या नकाशाच्या मागील बाजूस एका माणसाचे चित्र होते ते चित्र त्या मुलाने जोडले आणि दुसऱ्या बाजूने जग आपोआप जोडले गेले. मुलांनो, माणूस जोडा. कुणालाही दुखवू नका. द्वेष, मत्सर, तंटा यांना थारा देऊ नका. सर्वांशी सलोख्याने वागा. हा मंत्र मी वरील संस्कार कथेच्या माध्यमातून बटूंना दिला.
सध्याचे युग प्रचंड स्पर्धेचे आहे. प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा सुरू आहे. बालवयातच मुलांवर शालेय अभ्यासाचे दडपण येते. मानसिक दडपणांमुळे त्यांचे शैशव कोमेजून जाते. खरे म्हणजे आताची पिढी प्रचंड बुद्धिमान आहे. अगदी दीड-दोन वर्षांची मुलेही मोबाइल हाताळताना दिसतात. या पिढीवर योग्य वयात योग्य असे संस्कार घडणे अत्यावशक आहे.
अनुभव मालिकेतील या माझ्या आजच्या लेखाच्या अंतिम टप्प्यात वळताना एक आठवण सांगावीशी वाटते. मी आयकर खात्यात काम करीत होतो. एका संस्थेच्या वार्षिक अहवालातील हिशेबात मला काही त्रुटी आढळल्यावर मी त्या संस्थेच्या जबाबदार व्यक्तीशी बोललो तेव्हा त्या संस्थेचा एक युवा कार्यकर्ता मला म्हणाला, साहेब, आजकाल सार्वजनिक कार्य करताना अनेकजण घोटाळे करतात. आम्ही थोडी लबाडी केली तर काय बिघडणार आहे? त्याच्या या प्रश्नाने मी अवाक् झालो.
योग्य वयात योग्य संस्कार केले गेले तर आदर्शवत अशी भावी पिढी निर्माण होईल ही गोष्ट अधोरेखित करताना मला खंडाळा पारगाव येथील श्रावणी संघटनेचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र रामचंद्र धर्माधिकारी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन
करावेसे वाटते.
बबन पोतदार





