रूपगंध : ‘…अनाहत ‘ : नादनिनादांची हुंकार यात्रा

(काव्यसमीक्षण – प्र. श्री. जाधव)
‘अनाहत’ हा व्यंकटेश चौधरी यांचा नवीन काव्यसंग्रह वाचला. अनाहत या शीर्षकाची उत्कंठा मनात लागून राहिली होती. नावाप्रमाणेच हा काव्यसंग्रहही वाचता वाचता गूढ होत गेला. ज्या निर्मिकाने ही सृष्टी निर्मिली त्याच्याही आधीपासूनच हा ‘अनाहत नाद’ या विश्वात भरून आहे. आणि हे विश्व नसले तरीही, हाच नाद चालू राहणार आहे. अशी धारणा आपल्या संस्कृतीची आहे.
सांख्यदर्शनानुसार ही पंचमहाभूते सृष्टीच्या सर्व भौतिक आणि सजीव-निर्जीव घटकांची निर्मिती करतात. प्रत्येक महाभूतामध्ये काही मूलतत्त्व गुण किंवा तन्मात्रा अस्तित्वात असतात. ज्यांनी त्यांचे कार्य सुस्पष्ट होते. उदाहरणार्थ, पृथ्वी तत्त्वाचा गुण गंध, जल तत्त्वाचा गुण रस, तेजाचा गुण रूप, वायूचा गुण स्पर्श आणि आकाशाचा गुण शब्द किंवा ध्वनी असा मानला जातो.
‘आहत’ नाद म्हणजे आपल्या इंद्रियांच्या द्वारे ऐकता येणारा ‘इंद्रिय’ नाद होय, तर ‘अनाहत’ म्हणजे इंद्रियाद्वारा ऐकता न येणारा इंद्रियातीत नाद/आवाज होय. ‘आहत नाद’ हा घर्षणातून/कंपनातून उत्पन्न होतो. ‘अनाहत नाद’ म्हणजे तो ‘अघातविरहित’ किंवा ‘अकंपित’ दिव्य नाद आहे, जो योगी किंवा साधक त्यांच्या शरीरातील अनाहत चक्रात ऐकू शकतो. हा नाद एक स्वरूपातील स्पंदन किंवा आवाज आहे. जो परमशांततेचे आणि आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक मानल्या जातो. ज्यांची कुंडलिनी जागृत होते, त्यांनाच हा नाद ऐकू येतो. अशीही साधना योगशास्त्रात सांगितली आहे. एवढा विस्तार एवढ्यासाठीच की, या संग्रहाला ‘अनाहत’ हे दिलेले नाव होय.
तंद्री मग ती कोणतीही असो, योगातली असो की, योगायोगातली; ती साधली तरच तादात्म्यता साधते. तादात्म्यता हे जशी भक्तीतून पावते, तशी प्रेमातूनही साधता येते. राग आणि अनुराग ही प्रेमाचीच रूपे आहेत. जी या संग्रहात पावलोपावली भेटतात. अन् हेच या काव्यसंग्रहाचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
राग हाच द्वैतभाव तर, अनुराग हा अद्वैतभाव होय. यातली उकल ज्याला चांगली कळेल, त्यालाच संग्रहही कळेल… नाहीतर निव्वळ शब्दच्छल ठरेल; किंवा ती व्यक्ती छिद्रान्वेषी ठरेल. कारण आकाशाचे रूप हे शब्द आहेत, नाहीतरी अमूर्ताला कसे पकडणार ?
या संग्रहातील ही पहिलीच कविता वरील शब्द व्यवहाराचा दाखला ठरते –
‘तू अथांग, अनंत, दिगंत….
मी अनंग, भणंग, वसंत….
द्वैत आणि अद्वैताच्या सीमा पुसणारे हे शब्दसूक्त होय. अशी स्थळे या संग्रहात जागोजागी आढळून येतात. येथे वीजच वेदनांचे घर शाकारून तलखीचे गाव झेलणारी आहे. उन्मेषाचा वसा घेऊन न थांबण्याचे गोंदण गोंदवून घेतले आहे. असे असले तरी, पूर्वा गर्भारेस्तोर धीर धरण्याचा आत्मसंयम आहे. कुठे पोहोचायचे हे निश्चित नसले तरी, कोणाची तरी प्रतीक्षा आहे.
येईल येईल
पहाटे नंतर तो येईल
अन् फाटेल अंधार अन्
उजेड होईल
कारण येथले भास स्वतःचेच अनोळखी वाटत आहेत, आणि उद्ध्वस्त गाव पुनर्वसन मागते आहे. शंकेचं बीज वाईटच; कारण त्याचं झाड व्हायला वेळ लागत नाही.
आयुष्याच्या सायंकाळी
पुन्हा सजून येतो
उन्मळून जाता जाता
पुन्हा रुजून येतो.
माणसाचे माणसाशी एकदा स्नेहबंध जडले की, ते तोडता येत नाहीत आणि फिनिक्स प्रमाणे जिद्द असली की माणूस कितीही जळाला, कितीही उदासी आली, कितीही दुःखात कितपत पडला तरी; ती जिद्द त्याला राखेतूनही फिनिक्सप्रमाणे उडण्यास भाग पाडते. हे नित्याचेच उन्मळून येणं असले तरी इथे चंद्र गस्तीला आहे आणि स्वप्नांच्या वस्तीला नीज आलेली आहे. अनावर वेगावेगाच्या निचऱ्यानंतर तृप्ती व क्लांतता अनुभवायला मिळते आहे. प्रतीक-प्रतिमांचा वापर येथे चपखल झालेला दिसून येतो. मनाला झालेल्या संवेदनांना शब्दांत पकडणे खूप महत्त्वाचे असते. या संग्रहात हे नेमकेपणाने पकडण्याचा प्रयत्न झाला आहे.
जराशा शंकेचं बीज अकस्मात झाड होतं
साध्यासुध्या चिठोऱ्याचं नकळत बाड होतं.
संशयाचे भूत एकदा मनात शिरलं की, तिळाचा ताड व्हायला वेळ लागत नाही.
प्रत्येक संसारी माणसाच्या काही ठरावीक अपेक्षा असतात; पण नेहमीच्या रहाटगाड्यात ते करणे शक्य नसते, त्या इच्छा, ते बेत, ते स्वप्निल सहवास आणि ठरवलेले बेत मात्र मागे पडत जातात.
ऋतू येतात जातात असेच
पण थकत नाहीस तू
अन् मीही
हे या ओळीतून व्यक्त होते.
प्रसवाच्या वेदना जशा असतात, तशाच साहित्यिकांनाही निर्मितीच्या वेदना साहाव्या लागतात. त्यामुळे कवीच्या मनात एक सल ठसठसून राहणारी, सतत ठसठसत राहणारी, पुन्हा पुन्हा उसवायला लावणारी ती सल ‘कविते’ या कवितेतून व्यक्त होते.
कविते
तू मला गवसायला
नकोच होते
पुन्हा फिरून मग उसवायला
नकोच होते
या काव्यसंग्रहात पानोपानी प्रेमाच्या कविता, विरहाच्या कविता, उदासीनतेच्या कविता सखीत आणि प्रियेत बेमालूम मिसळून गेल्याच्या कविता शब्दांत व्यक्त होऊ पाहतात. कवी त्या बऱ्याचश्या शब्दांत टिपण्यात यशस्वी झालेला आहे. कवीची शब्दसंपदा नि शब्दसामर्थ्य अफाट असल्याचे जाणवत राहते. उदाहरणार्थ –
देह जणू झाला
अवघा गोकूळ
तरी का व्याकूळ
जीव होई
तितिक्षा आणि प्रतीक्षा असली की, मनातले भाव कागदावर सहज प्रगटत जातात. यातील व्याकूळता, ओढ सर्व शब्दांत बेमालूम पकडलेली दिसून येते.
आळवलाच नाही मी
मेघमल्हार
तरीही धावून आल्या पाऊसधारा
आता
ढगांनाही माझी व्याकुळता
कळायला लागली आहे
माणूस जगत जातो. संसाराचा गाडा रेटत जातो आणि अशाच एका वळणावर येऊन तो थांबतो. सिंहावलोकन किंवा पुनरावलोकन करतो, तर खरंच आपण इतकी पायपीट कशी केली? या अचंब्यात तो पडतो –
मी आकांताने जपलं
तुझ्या अस्तित्वाचं पान
कुठल्या संमोहात मी
तुडवलं इतकं रान
या संग्रहात ‘बाई’ हे संबोधन वापरून पाच-सहा कविता लिहिल्या गेल्या आहेत. यात बाईला उद्देशून बाईपणाच्या सांत्वनाच्या आणि स्त्रीत्वाच्या, दुःखाच्या कविता अत्यंत मनस्वीपणे चितारल्या आहेत मग ह्यात परिस्थितीशी जुळवून घेणं आलं, आवेगी जगणं आलं, बेभान भोगाचा श्वास आला आणि जेव्हा आवेग ओसरल्यानंतर रस्त्याच्या कडेचे उपाशी मूल दिसत नाही, तेव्हा हे पाहून आलेले वात्सल्याचे भान हेही टाळता येत नाही. यात घायाळ वास्तव मनाची समजूत, मनातल्या आतले हुंकार कवितेतून प्रकटत जातात. बाई ह्या कवितेत कवी म्हणतो –
बाई
तू आता अधिकच
ठसठशीत होतेयस
चिंता करू नकोस पण
तुझी पावलं पेलणारा
माझा तळवा
अनंत संवेदी आहे
मिलनाची नि प्रणयाची ओढ अपरिहार्य असते. ही अपरिहार्य ओढ
अंगंगाची तगमग प्रतीक्षेत डोळे सुकले
पाहून कळवळा धरणीचा, आभाळ जरासे झुकले
या शब्दातून व्यक्त होते.
पण ही मिलनाची अपरिहार्य ओढ आयुष्यभर जगूनही ती शेवटपर्यंत अतृप्तच राहते. आयुष्याच्या शेवटी त्याला हे मिलनाचे चक्र पुन्हा मूळ आरंभ-बिंदूपासून सुरू व्हावं असं मनोमन वाटू लागते –
फिरव ना कालचक्र उलट
पुन्हा त्या आरंभबिंदूशी
जिथून उमटली तुझी पावलं
माझ्या काळजाच्या कॅनवासवर
कवी समर्पित झाल्या आयुष्यालाही आणि या हळवेपणातही काही विभ्रम-संभ्रम राखून आहे अस्तित्व समर्पित झाल्यावर –
असू नयेत कुठलेच संभ्रम
कुठल्याही संदर्भाविन
अनुभवावेत सारेच विभ्रम
आयुष्यात माणसाला सर्वच अनुभवावं वाटतं. मग त्याला कोणतेच संदर्भ नसले तरी, चालतील. ही जगण्याची बेहोशी, वास्तवाचं भान राखून आहे, मनाच्या तरल अवस्थेत संवेदना किती उच्च कोटींपर्यंत पोहोचतात, यांचा प्रत्यक्षात शब्दप्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. हा या काव्यसंग्रहाचा महत्त्वाचा गुण आहे. अशी प्रत्ययकारिता अनुभवायला नुसतं शाब्दिक ज्ञान असून चालत नाही तर, ती तादात्म्यवृत्तीही असायला हवी.
जीवन भास-आभासाचे, जीवन श्वास-नि:श्वासाचे जीवन अर्पण नि समर्पणाचे झाले की, ही तल्लीनता प्राप्त होते. गृहीतके इतकी पक्की होतात की, साधी सकाळही एक भावचित्र रूपानं प्रगट नि प्रकट होते.
बघ पहाटेला
तू रंग दिलास
सारंच
उजळून आलंय
…तूही ही एकात्मता अनुभवायला एका उच्च पातळीवरचं ऐक्यभाव नि मनाची तन्मयता हवी असते. या संग्रहातील अनेक कविता ह्या अल्पाक्षर-रमणीय आहेत. हेही एक काव्य वैशिष्ट्यच आहे.
एखाद्या निष्णात चित्रकारांने रंगाचे दोनचार फटकारे मारावेत आणि एक अद्भुत खिळवून ठेवणारे देखणे चित्र साकारावे तसंच येथे दोनचार शब्दांच्या फटकाऱ्यातून शब्दचित्र साकारले जाते. चित्रमयताही या कवितेचा विशेष गुण होय.
तू उफानली नदी नदी मी मूक स्तब्ध किनारा
तू हरवलीसच कधी मी स्तब्ध सहारा
किंवा
नको अशी सैरभैर होऊ, ऊठ सावर, बघ पूर्वेची लाली
पसरेल सळसळ चैतन्याची अन् हळूच खळी उमटेल गाली
आणि
चराचरानं कात टाकली अन् सारंच टवटवलंय
फुटवे लगडून फांद्यांनी झाड अवघं लवलवलंय…
आणि
पुनर्वसनानंतर गाव पुन्हा फुलू लागले
जुन्या भिंती पडकेवाडे यांच्या साक्षीने नवे स्वप्न पुन्हा झुलू लागले
‘अनाहत’मधील बहुतांशी कविता ह्या गेय, नादानुकारी, तर काही गझलसदृश्य आहेत. काही कविता ह्या उत्तम प्रकारच्या भावगीत रचना आहेत, तर काही मुक्त छंदात्मक आहेत. अल्पाक्षरी शब्दलेणं लेवून काही कविता वाचकांना पुनर्प्रत्ययाचा अनुभव देतात. तर काही कविता वैचारिकतेने अंतर्मुख करतात. थोड्याच कविता ह्या दीर्घ कविता आहेत.
या संग्रहातून कवी व्यक्त होत जातो. तत्त्व पेरत नाही किंवा तत्त्वज्ञान पाजळत नाही. निर्मळ, निखळ जीवनाचे आत्मभान जिवापाड जपतो. प्रेमसंचित हे शब्दसंचित नि शब्दसिंचित करून टाकतो. एक मूर्त तरी अमूर्त असं काही भास-आभासाच्या पलीकडले उलगडून दाखवतो. ह्या कविता वाचल्यानंतर कळून जातं खरोखरच ‘प्रतिभेच्या साहसांना सीमाच नसतात…’ द्वैत-अद्वैताच्याही पलीकडेही काही असावं, अशी आसुसी लागून राहते. काही चांगलं वाचल्याची अनुभूती होऊन जाते. कल्पनातीत तरी शब्दातीत असलेले हे शब्दसंचित वाचकांनी वाचूनच प्रत्यय घ्यावा. इतकी ही भावप्रत्ययकारी कविता आहे. या काव्य संग्रहाचे मुखपृष्ठ चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी सुंदर रेखाटले आहे. अमूर्त चित्रशैलीतील (अॅबसट्रॅक्ट पेंटिंग स्टाईल) पॅचवर्क हे आकर्षक झाले आहे. कवीच्या पुढील वाटचालीस सुहृद शुभेच्छा….!
काव्यसंग्रह : ‘अनाहत’
कवी : व्यंकटेश चौधरी
मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी
प्रकाशन : इसाप प्रकाशन, नांदेड
पृष्ठे : ११२
किंमत : २४० ₹





