सात-बारा, प्रॉपर्टी कार्डमध्ये नोंद अशी दुहेरी पद्धत

पुणे –नगरभूमापन हद्दीत बिनशेतीच्या नोंदी प्रॉपर्टी कार्डवर तर शेती मिळकतीच्या नोंदी या सात-बारा उताऱ्यावर तलाठ्यांकडून घेतल्या जातात. अशा प्रकारे अभिलेखाची दुहेरी नोंद पद्धत अस्तित्वात असल्यामुळे सात-बारा उतारा व प्रॉपर्टी कार्डवरील नोंदी यामध्ये विसंगती दिसून येतात. तसेच या दोन्ही नोंदीवरून हस्तांतरणाचे व्यवहार होऊन फसवणूक होण्याचे प्रकार वाढत आहेत. यापार्श्वभूमीवर नगर भूमापन हद्दीतील शेती मिळकतीसह सर्व मिळकतीच्या बाबतीच्या नोंदी प्रॉपर्टी कार्डमध्ये करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी राज्य शासनाने जमाबंदी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे.
नगरभूमापन झालेल्या शेती व्यतिरिक्त जमिनीचे अधिकार अभिलेख नगर भूमापन अधिकारी ठेवतात. त्यातील हस्तांतरणाच्या नोंदींची कार्यवाही करण्यात येते. नगरभूमापन हद्दीतील शेती मिळकती बिनशेती झाल्यानंतर मोजणीअंती प्रॉपर्टी कार्डवर अंमल घेण्यात येतो. तसेच नगरभूमापन हद्दीतील शेती मिळकतींचे अधिकार अभिलेख सात-बारा उतारे हे तलाठ्यांकडून ठेवले जात असून त्यांच्याकडून हस्तांतरणाच्या नोंदी घेतल्या जातात. अशा प्रकारे अधिकार अभिलेखाची दुहेरी नोंद पद्धत अस्तित्वात आहे. आता अनेक गावे महापालिकेत येवूनही याठिकाणी प्रॉपर्टी कार्ड व सात-बारा उतारा अशी दोन्हीमध्ये नोंदी होतात.
पालिकेच्या हद्दीत फक्त सात-बारा उताऱ्याऐवजी प्रॉपर्टी कार्डवरच सर्व नोंदी घेण्याचा विचार शासनदरबारी सुरू आहे. यासाठी कायद्यातील तरतुदी व शासन परिपत्रके तसेच प्रत्यक्षात काम करताना येणाऱ्या अडचणी याबाबींचा विचार करून शासनास प्रस्ताव सादर करण्यासाठी ही समिती नेमली आहे.
समितीची कामे
नगरभूमापन हद्दीतील दुहेरी अधिकार अभिलेख बंद करण्याबाबतची सद्यस्थितीची माहिती घेणे
प्रचलित कायदे व नियमात काय दुरुस्ती करणे योग्य होईल, हे पाहणे
दुहेरी सात-बारा बंद करण्याबाबत प्रचाराची कार्यवाही करणे
अकृषक जमीन महसूल वसुलीची जबाबदारी निश्चित करणे.





