Satara ZP Education : सातारा जिल्हा परिषदेचा राज्यात डंका! केंद्र सरकारकडून शैक्षणिक गुणवत्तेवर ‘ए वन’ शिक्का
Satara ZP Education : केंद्र सरकारच्या २०२४-२५ च्या शैक्षणिक कार्यक्षमता निर्देशांकात सातारा जिल्हा राज्यात द्वितीय; ४०४ गुण मिळवून ऐतिहासिक कामगिरी.

Satara ZP Education – केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या सन २०२४ -२५ च्या शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकात सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला आहे. कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांक ही मूल्यमापन प्रक्रिया शिक्षण क्षेत्रात अत्यंत मानाची मानली जाते. केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय मार्फत ही प्रतवारी जाहीर करण्यात आली.
केंद्र सरकारच्या शैक्षणिक गुणवत्ता निर्देशांक सातारा जिल्ह्याचा द्वितीय क्रमांक आला असून जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या कामावर केंद्र सरकारची मोहर उमटली आहे. सातारा जिल्ह्याने पहिल्यांदाच ४०० गुणांचा टप्पा ओलांडला एकूण ४०४ गुण मिळवून जिल्ह्याने मागच्या दोन वर्षापेक्षा तब्बल ६३ गुण जादा मिळवले. मागील वर्षापासून मराठी भाषेच्या वाचन, लेखन तसेच गणिताच्या सर्व गणितीय क्रिया, इंग्रजीच्या वाचन लेखन संभाषण या कौशल्यासाठी केलेले विशेष प्रयत्न,
माझी शाळा सुंदर शाळा या जिल्ह्यातील विशेष उपक्रमांतर्गत शाळेमध्ये झालेल्या भौतिक सुविधा, गुणवत्ता विकासासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम, शिक्षकांनी अध्ययन अध्यापनामध्ये केलेले बदल, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी या क्षेत्रीय यंत्रणेने केलेले वस्तुनिष्ठ काम, यु डायसची प्रभावी अंमलबजावणी यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने हे यश मिळवल्याची माहिती प्राथमिकचे शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी राबवलेल्या पूर्ण उपक्रमांची दखल घेऊन हे मानांकन देण्यात आले आहे. केंद्रीय शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स नुसार शैक्षणिक निर्देशांक निश्चित केले जातात. यामध्ये ७२ दर्शकासाठी एकूण ६०० गुण असतात. या गुणाच्या आधारे देशातील शैक्षणिक निर्देशांकामधील स्थान निश्चित करण्यात येते.
दर्जेदार शिक्षण देण्यावर भर देत विद्यार्थ्यांना सर्व विषय सोपे व रंजक वाटावे यासाठी निपुण अंतर्गत विविध उपक्रमांची अंमलबजावणी केली. डिजिटल व्हिडिओ, ऑनलाइन सराव चाचण्या आदी उपक्रम राबवण्यात आले. जिल्हा परिषद शाळांमधील माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमाची चर्चा राज्यभर झाली. या सर्व अभिनव उपक्रमांची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले.
विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण आणि शैक्षणिक वातावरणात मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल झाले. या कार्याची दखल घेऊन शैक्षणिक क्षेत्रामध्ये अत्यंत मानाचे मानले जाणारे मानांकन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला मिळाले आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले,
शिक्षण व अर्थ समितीच्या सभापती सौ. तेजस्विनी कदम यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन तसेच प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांचे अभिनंदन केले. शिक्षण विभागाच्या यशामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था फलटणचे प्राचार्य अधिव्याख्याता, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी यांचे सहकार्य मोलाचे ठरले.






