Satara Ganeshotsav: सातारा जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय! गणेशोत्सवात ‘हे’ नियम पाळावेच लागणार, अन्यथा…
Satara Ganeshotsav: सातारा जिल्ह्यात जलप्रदूषण रोखण्यासाठी कृत्रिम तलाव अन् निर्माल्य संकलनावर जिल्हा परिषदेचा भर; ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पनेसह पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी डॉ. प्रिया शिंदे यांचे आवाहन.

Satara Ganeshotsav – जिल्ह्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव नियोजनबद्ध आणि धार्मिक भावना अबाधित ठेवून साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेमार्फत व्यापक नियोजन करण्यात येत आहे. नदी, तलाव, पिण्याच्या पाण्याच्या विहिरी यांसह सार्वजनिक जलस्रोतांचे प्रदूषण होऊ नये, यासाठी ग्रामपंचायत स्तरावर आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्ह्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव राबवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. सौ. प्रिया शिंदे व उपाध्यक्ष राजू भोसले यांनी केले आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने गावागावांत ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पनेच्या प्रसारासाठी प्रबोधन करण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन न करता त्या कायमस्वरूपी जतन करण्यासाठी तरुण मंडळांना आवाहन केले जाणार आहे.
घरगुती गणेशमूर्तींसाठी माती, वाळू, संगमरवरी किंवा इतर पर्यायी पर्यावरणपूरक मूर्तींचा वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. घरगुती गणेशमूर्तींचे शक्यतो घरीच विसर्जन करण्याचे आवाहन असून, ते शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम तलाव किंवा कुंडामध्ये विसर्जन करण्यासाठी नागरिकांचे प्रबोधन केले जाणार आहे.
सहा फूट उंचीपर्यंतच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी आवश्यक व पुरेशा संख्येने कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्याच्या सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आल्या आहेत. सहा फूटांपेक्षा कमी उंचीच्या सर्व गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्येच करण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येणार असल्याचे डॉ. सौ. शिंदे यांनी स्पष्ट केले.
महिला बचत गटांमार्फत निर्माल्य संकलन, स्वच्छता मोहिम, प्लॅस्टिकमुक्ती व पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ग्रामस्थ व मंडळांनी स्थानिक प्रजातींच्या वृक्षांची लागवड करुन त्यांचे संगोपन करावे. वृक्षांचे नियमित संगोपन, संरक्षण व पाणी व्यवस्थापन करावे, असे आवाहन डॉ. प्रिया शिंदे यांनी केले.
फेरविसर्जनासाठी संकलित केलेल्या मूर्ती शक्य असल्यास सर्वांनुमतीने कुंभारांकडे परत देण्यासाठी गावस्तरावर कुंभारांची यादी देण्यात येणार आहे. संकलित मूर्तींची विटंबना किंवा दुर्लक्ष होणार नाही, याची दक्षता घेण्याचे व निर्माल्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.
गावनिहाय निर्माल्य संकलन केंद्रे ठरवून संकलित निर्माल्य नॅडेप पद्धतीच्या खत निर्मिती केंद्रांमध्ये पोचवून त्यापासून सेंद्रिय खत तयार करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे राजू भोसले यांनी सांगितले. धार्मिक श्रद्धा व परंपरांचा सन्मान राखत जलस्रोतांचे प्रदूषण रोखावे आणि स्वच्छ व सुंदर जिल्ह्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याशनी नागराजन यांनी केले.






