Satara News: जिल्ह्यात रोजगार हमीची कामे होणार गतीमान! जिल्हा परिषदेमार्फत दुष्काळ प्रतिबंधात्मक उपाययोज सुरूना
Satara News: गावतलाव, पाझर तलावांतील गाळ काढून शेती अन् जलसाठा वाढवणार; ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा १५ दिवसांचा मास्टर प्लॅन.

Satara News- राज्यातील २६५ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त ‘ट्रिगर एक’मध्ये समावेश झाला असून यामध्ये जिल्ह्यातील सातारा, खटाव, माण ,फलटण, खंडाळा व महाबळेश्वर या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त भागासाठी राज्य शासनाकडून विशेष बाब म्हणून उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपाययोजनांमध्ये रोजगार हमी योजनेची जास्तीत जास्त कामे सुरु करण्यात येणार आहेत.
त्यानुसार जिल्ह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे गतीमान करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. सद्यस्थितीत जिल्हयातील इतर तालुक्यांमध्ये भविष्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे सर्व तालुक्यांमध्ये येणाऱ्या १५ दिवसांसाठी कार्यवाही निश्चित करण्यात आली आहे.
सर्व ग्रामपंचायतीमध्ये ‘जी राम जी’ योजनेंतर्गत जास्तीत जास्त कामे प्रस्तावित करुन या कामांमध्ये जलसंधारणविषयक कामांचा जास्त प्रमाणात समावेश करण्यात आला आहे. दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने संनियत्रंणासाठी सर्व ग्रामपंचायतींसाठी विस्तार अधिकारी (पंचायत, कृषी, सांख्यिकी) यांची पालक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
दुष्काळी परिस्थतीच्या अनुषंगाने व संभाव्य परिस्थितीमध्ये सर्व ग्रामपंचायतीमध्ये गाळ काढणे, गाव तलाव, पाझर तलाव, सिमेंट नाला बंधारा, कोल्हापूर प्रकारचा बंधारा, माती नाला बांध, जलस्त्रोताजवळ भूमिगत बंधारे सलग समतल चर, अनगड दगडी बांध, विहीर पुनर्भरण ,कंपार्टमेंट बंडिंग, वनराई बंधारे आदी कामे करण्यात येणार आहेत.
सद्यस्थितीमध्ये गावात उपलब्ध असणारे गाव तलाव, पाझर तलाव, कोल्हापूर प्रकारचा बंधारा, तलावातील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे जलसाठ्यामध्ये वाढ होऊन ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध होणार आहे. याशिवाय या गाळाचा उपयोग शेती उत्पादकता वाढीसाठी होण्याची शक्यता आहे. लोकसहभागाच्या माध्यमातून वनराई बंधाऱ्यांची कामे सर्व ग्रामपंचायतीमध्ये प्रस्तावित केलेली असून दि. २ ऑक्टोबर रोजी किमान ५ कामे सुरु करण्याचे नियोजन केले आहे.
यामध्ये वनराई बंधाऱ्याची कामे ग्रामस्थ, महिला बचत गट, तरुण मंडळे, महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, नॅशनल कॅडेट कॉर्प्स, राष्ट्रीय सेवा योजना यांच्यामार्फत लोकसहभाग व श्रमदानातून करण्याचे नियोजन केले आहे. तालुकास्तरावर दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने टंचाई कक्षाची स्थापना करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेतून देण्यात आली.





