Satara Traffic: पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट रस्त्यावर वाहतूक कोंडी! ५ मिनिटांच्या अंतरासाठी लागतोय १ तास; काय आहे कारण
Satara Traffic: मोटार वाहन अधिनियमानुसार पोलीस प्रशासनाने तातडीने अधिसूचना काढून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची नागरिकांची मागणी.

Satara Traffic – शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक असलेल्या पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक या रस्त्याचे चौपदरीकरण व काँक्रिटीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामामुळे रस्त्याची एक बाजू वाहतुकीस बंद करण्यात आल्याने, वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण आला असून, सकाळपासून रात्री उशिरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गाचा भाग असलेल्या या रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा व सत्र न्यायालय, जिल्हा परिषद, विशेष भूमी संपादन कार्यालये,
जिल्हा कोषागार कार्यालय, नगररचना कार्यालय, बांधकाम भवन, पोलीस उपअधीक्षक कार्यालय, विविध बँकांची विभागीय कार्यालये, शाखा, शासकीय निवासस्थाने आणि अनेक शैक्षणिक संस्था असल्याने दररोज हजारो नागरिकांची ये-जा सुरू असते. जिल्हा न्यायालयात सातारा, कोरेगाव आणि जावळी तालुक्यातील दावे, खटल्यांचे कामकाज चालत असल्याने, वकील, पक्षकार आणि नागरिकांची मोठी गर्दी असते. जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदार कार्यालयांमधील अपिले व अर्धन्यायिक प्रकरणांच्या सुनावण्यांसाठीही मोठ्या संख्येने नागरिक येतात.
वाहतूक नियंत्रणासाठी शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी प्रयत्न करत असले, तरी वाहनांची संख्या प्रचंड असल्याने आणि पावसामुळे परिस्थिती अधिकच गंभीर होत आहे. अनेक वाहनधारकांना पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट हा काही मिनिटांचा प्रवास करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास, तर काही वेळा एक तासापर्यंत वेळ लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग अधिनियम, मोटार वाहन अधिनियम 1988 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील तरतुदीनुसार सार्वजनिक सुरक्षितता व वाहतूक सुलभतेसाठी जिल्हा पोलीस प्रशासनाला तात्पुरत्या वाहतूक बदलाच्या अधिसूचना जारी करण्याचा अधिकार आहे. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सर्वेक्षण करून, तातडीने नवीन वाहतूक आराखडा लागू करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.





