Maharashtra Police : 9 पोलिसांना जन्मठेप! महाराष्ट्र पोलीस दलात मोठी खळबळ; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
Maharashtra Police : वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयाने २०११ मधील कोठडीतील मृत्यूप्रकरणी ऐतिहासिक निर्णय देत रिसोड पोलीस ठाण्यातील तत्कालीन ठाणेदारासह नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Maharashtra Police : वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयाने २०११ मधील कोठडीतील मृत्यूप्रकरणी ऐतिहासिक निर्णय देत रिसोड पोलीस ठाण्यातील तत्कालीन ठाणेदारासह नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी हा निकाल दिला असून, या निर्णयामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय ?
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वाढोणा येथील पारधी समाजातील बेग्या पवार याला ९ मे २०११ रोजी चोरीच्या संशयावरून रिसोड पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर १० मे रोजी पोलीस कोठडीत त्याचा मृत्यू झाला. कोठडीत अमानुष मारहाण झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाचा तब्बल १५ वर्षांनंतर निकाल लागला.
या पोलिसांना शिक्षा –
न्यायालयाने तत्कालीन पोलीस ठाणेदार महादेव माणिक धांडे यांच्यासह मदन पवार, शिवाजी खिल्लारी, पंजाब पाटकर, रमेश पवार, प्रकाश हिरालाल तारम, नागोराव खांडके, अशोक वैद्य आणि वसंत जाधव या नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
या प्रकरणाचा तपास राज्य सीआयडीकडे सोपविण्यात आला होता. सीआयडीने ३४ दिवसांत तपास पूर्ण करून संबंधित पोलिसांविरुद्ध खुनासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता.
सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील श्रीराम नारायणराव काळू यांनी युक्तिवाद केला. बेग्या पवार याच्याविरुद्ध कोणताही गुन्हा सिद्ध झाला नसताना कबुली मिळविण्यासाठी त्याच्यावर अमानुष छळ करण्यात आला आणि कायद्याचा गैरवापर करण्यात आला, असा मुद्दा त्यांनी न्यायालयासमोर मांडला.
पुरावे आणि साक्षींचा विचार करून न्यायालयाने आरोपींना भारतीय दंड संहितेतील खून, कबुलीजबाब मिळविण्यासाठी छळ करणे, गंभीर दुखापत करणे, समान उद्देशाने गुन्हा करणे आणि गुन्हेगारी कट रचणे यांसह विविध गंभीर कलमांखाली दोषी ठरविले.
कुटुंबीयांनी व्यक्त केले समाधान –
या निकालानंतर बेग्या पवार यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले. कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिस यंत्रणेतील अधिकाऱ्यांनाच कोठडीतील मृत्यूप्रकरणी खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झाल्याने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, राज्यभर त्याची चर्चा सुरू आहे.





