Maharashtra Politics : साताऱ्यातील शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी पहिल्यांदाच उघडपणे मंत्री व पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्यावर टीका करत नाराजी व्यक्त केली आहे. (Maharashtra Politics ) माध्यमांशी बोलताना महेश शिंदे यांनी आरोप केला की, “शंभूराजे देसाई मला सुरुवातीपासूनच वेगळी वागणूक देतात. कोणत्याही कार्यक्रमाला मला आमंत्रित केले जात नाही.” उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा दौऱ्यादरम्यानही आपल्याला निमंत्रण दिले गेले नसल्याचा दावा त्यांनी केला. “हा पहिलाच प्रसंग नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून माझे फोटो बॅनरवर लावले जात नाहीत,” असे सांगत त्यांनी पक्षातील उपेक्षेबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच “जिल्ह्यात खरे शिवसैनिक आहेत तरी कुठे?” असा सवाल करत स्थानिक नेतृत्वालाही त्यांनी टोला लगावला. (Maharashtra Politics ) जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “माझी पत्नी प्रिया शिंदे शिवसेनेतून निवडून आली असली तरी भाजपच्या पाठिंब्याने अध्यक्ष झाली.” यावरून आपण सुरुवातीपासून भाजपसोबत काम करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. याशिवाय, “पाच वर्ष पालकमंत्रीपद असूनही संघटनात्मक ताकद वाढवण्यात अपयश आले,” असा आरोप करत त्यांनी शंभूराज देसाई यांच्यावर थेट निशाणा साधला. या वक्तव्यामुळे साताऱ्यातील शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष उघड झाला असून, आगामी काळात याचे राजकीय परिणाम दिसण्याची शक्यता आहे. (Maharashtra Politics)