Eknath Shinde: “…तर तिथल्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यायला सांगा”; एकनाथ शिंदेंचे व्होट चोरीच्या आरोपांवर विरोधकांना प्रत्युत्तर
Eknath Shinde: खरी 'व्होट चोरी' तर २०१९ मध्ये झाली; शिंदेंचा हल्लाबोल

Eknath Shinde: दिल्लीत कथित व्होट चोरी आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात ‘इंडिया’ आघाडीकडून रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर दुसरीकडे आज ठाण्यात भाजप आणि महायुतीच्या वतीने भव्य ‘लोकतंत्र बचाव यात्रा’ काढण्यात आली.
या यात्रेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी आयोजित सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर आक्रमक भाषेत टीका केली.
विरोधकांवर हल्लाबोल करताना एकनाथ शिंदे यांनी, “जितकी तुम्ही मोदींवर टीका कराल, तितके तुम्ही खड्ड्यात जाल. तुम्ही रोज ओरडता आणि मोदीजींना शिव्या देता. ज्या दिवशी ते तुमच्याकडे पाहतील, त्यादिवशी तुम्हाला अवघड जाईल,” असा इशारा दिला.
३६ देशांनी मोदीजींना सर्वोच्च नागरी पुरस्कार दिले
पुढे ते म्हणाले, “जगातील ३६ देशांनी मोदीजींना सर्वोच्च नागरी पुरस्कार दिले आहेत, पण तुम्ही परदेशात जाऊन देशाची बदनामी करता. हा एक प्रकारे देशद्रोह आणि राष्ट्रद्रोह आहे. विरोधक परकीय शक्तींसोबत काम करून देशात अराजकता माजवू पाहत आहेत. अरे तुमचा बाप आला तरी, सात पिढ्या आल्या तरी तुम्ही मोदींच्या केसाला धक्का लावू शकणार नाही.”
बाळासाहेब ठाकरे यांचे अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्याचे आणि जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचे स्वप्न पंतप्रधान मोदींनीच पूर्ण केले, अशी आठवणही त्यांनी करून दिली. तसेच “शत्रूच्या देशात घुसून मारणारा हा नवा भारत आहे. तुम्ही मोदीजींवर आणि देशाच्या सैन्यावर टीका करता?
सर्जिकल स्ट्राईकमध्ये किती माणसे मारली हे विचारता? देशात अराजकता पसरवण्याचा तुमचा प्रयत्न आहे, परंतु देशातील जनता पंतप्रधान मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. संपूर्ण जगात युद्ध सुरू असताना मोदीजींनी भारताची अर्थव्यवस्था मजबूत ठेवली आहे,” असेही एकनाथ शिंदे म्हणाले. Eknath Shinde
‘फेक नॅरेटिव्ह महाराष्ट्रात चालणार नाही’
विरोधी पक्षांच्या ‘व्होट चोरी’च्या आरोपांवर शिंदे म्हणाले, “सगळ्यात मोठी व्होट चोरी २०१९ मध्ये झाली होती. त्यावेळी महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना-भाजप युतीला स्पष्ट सत्ता दिली होती, पण तुम्ही केवळ सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलात. खरी व्होट चोरी आणि नोट चोरी तुम्ही केली होती.
जर तुम्हाला ईव्हीएम आणि निवडणुकीवर शंका असेल, तर इतर राज्यांत तुमची जिथे सरकारे आली आहेत, तिथल्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यायला सांगा. तुमचे हे फेक नॅरेटिव्ह महाराष्ट्रात चालणार नाही.” Eknath Shinde
हेही वाचा:
‘Gen Z Baba’ : वय फक्त १९ वर्षे! ‘जेनजी बाबा’ ची सोशल मीडियावर चर्चेत; नेमके कोण आहेत?





