Supriya Sule : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना जोर आला आहे. भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज राहुरीत जाहीर सभा पार पडणार, याच सभेत प्राजक्त तनपुरे कमळ हाती घेतील, अशी चर्चा रंगली आहे.
यावर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देताना आपल्याला तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाबाबत कोणतीही अधिकृत माहिती नसल्याचे स्पष्ट केले.
“मी प्राजक्त तनपुरे यांच्याशी अनेकदा संवाद साधला आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले होते. कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी मला सांगितले. पुढे आपण एकत्र काम करू, असेही त्यांनी नमूद केले होते.”

तनपुरे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “शक्य असेल. पण ते मला तसं काही बोललेले नाहीत. मी त्यांच्यासोबत अनेक वर्षे काम केले आहे.” अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
तनपुरेंच्या त्या विधानानंतर चर्चांना उधाण
दरम्यान, प्राजक्त तनपुरे यांनी सध्याच्या राजकारणावर भाष्य करताना तत्त्वनिष्ठ राजकारण्यांचे महत्त्व कमी होत चालल्याची खंत व्यक्त केली होती. “निष्ठा आणि तत्त्वांशी प्रामाणिक राहणाऱ्यांचे राजकारण संपत चालले आहे, तर तडजोड करणारे सत्तेत मोठ्या पदांवर पोहोचत आहेत,” असे त्यांनी म्हटले होते.
या वक्तव्यानंतर त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले असून, ते भाजपमध्ये प्रवेश करणार की स्वतंत्र भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज राहुरीत मुख्यमंत्र्यांची सभा
राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची येथे सभा पार पडणार आहे. या जागेसाठी भाजपकडून दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या सभेत मोठी राजकीय घडामोड घडणार असल्याची चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात रंगली आहे.
प्राजक्त तनुपरेंचे वर्चस्व
राहुरी तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, बाजार समित्या आणि साखर कारखान्यांवर तनपुरे कुटुंबाचे वर्चस्व असल्याने त्यांचा निर्णय निर्णायक ठरणार आहे. त्यांनी भाजपला पाठिंबा दिल्यास तो शरद पवार गटासाठी मोठा धक्का असणार आहे.
प्राजक्त तनपुरे यांनी 20 तारखेला म्हणजेच आजच कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून पुढील राजकीय वाटचालीची दिशा ठरवणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे प्राजक्त तनपुरे आज काय भूमिका घेतात याकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे.