Satara Pusegaon ST bus – सातारा-पुसेगाव या महत्त्वाच्या ग्रामीण मार्गावर एसटीची शटल बससेवा सुरू झाली आहे. प्रवाशांच्या दीर्घकालीन मागणीला एसटी महामंडळाच्या कोरेगाव आगाराने प्रतिसाद दिला आहे. पुसेगाव, ता. खटाव येथील श्री सेवागिरी महाराज मंदिरात दर्शनासाठी जाणारे भाविक, स्थानिक ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन, शुक्रवारपासून ही सेवा सुरू झाली आहे.सातारा जिल्हा एसटी प्रवासी संघटनेच्यावतीने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्यांकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. या मार्गावर सुपरफास्ट बससेवा सुरू होती. मात्र, या बसेस ग्रामीण भागातील छोट्या थांब्यांवर थांबत नसल्याने पुसेगावपर्यंतच्या 15 ते 20 गावांमधील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयांमध्ये वेळेवर पोहोचणे कठीण होत होते. पुसेगाव येथे जाणार्या भाविकांचीही गैरसोय होत होती. नवीन सेवेत सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत दर एक तासाला बस धावणार आहे. कोरेगावहून दुपारी 12.45 वाजता बस सुटून पुसेगाव-सातारा-पुसेगाव अशी फेरी करणार आहे. सातारा येथे सायंकाळी बसचा मुक्काम राहणार असून, दुसर्या दिवशी सकाळी 7 वाजता बस सोडली जाईल. पुसेगावहून दुपारी 12.30 वाजता बस सुटून कोरेगाव येथे पोहोचणार आहे. पुसेगाव, वर्धनगड, नेर, विसापूर, रामोशीवाडी, भाटमवाडी, चिमणगाव, वडाचीवाडी, कुमठे फाटा, कोरेगाव, शिरढोण, ल्हासुर्णे, मुगाव, जरेवाडी, तांदुळवाडी, मंगळापूर, भिवडी, जांब बुद्रुक, त्रिपुटी, खावली, क्षेत्र माहुली, संगम माहुली या गावांमधील प्रवाशांना या बससेवेचा लाभ होणार आहे. जिल्हा एसटी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष विलास शहा यांनी सांगितले की, ही बससेवा सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. भविष्यात ही सेवा सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी संघटनेच्यावतीने आमदार महेश शिंदे, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांच्याकडे प्रस्ताव देण्यात येणार आहे.