प्रभात वृत्तसेवा मंचर – श्री क्षेत्र भीमाशंकर येथील मंदिर विकास कामांसाठी शुक्रवार, दि.९ पासून पुढील तीन महिने मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे.या निर्णयाचा थेट परिणाम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उत्पन्नावर झाला असून एसटीच्या प्रवासी संख्येत मोठी घट झाली आहे. भाविकांची संख्या कमी झाल्याने एसटी महामंडळाला आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. पुणे,शिवाजीनगर एसटी आगार, मंचर एसटी आगार, परेल एसटी आगार, कुर्ला एसटी आगार यांसह विविध आगारांमधून दररोज जवळपास वीस एसटी बस गाड्या भीमाशंकर येथे भाविकांना देवदर्शनासाठी घेऊन जात होत्या. मंदिर बंद होण्यापूर्वी प्रत्येक एसटी बसमध्ये सरासरी पन्नास ते साठ प्रवासी दर्शनासाठी प्रवास करत होते. मात्र, मंदिर बंद झाल्यापासून ही संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. सध्या बहुतांश एसटी गाड्यांमध्ये जेमतेम वीस ते पंचवीस प्रवासी प्रवास करत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे लांब पल्ल्याच्या फेऱ्या तोट्यात चालू असून एसटी महामंडळाच्या दैनंदिन उत्पन्नावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. भीमाशंकर हे राज्यातील प्रमुख धार्मिक पर्यटन स्थळ असल्याने येथे वर्षभर भाविकांची मोठी गर्दी असते. विशेषतः शुक्रवार, शनिवार व रविवार या दिवशी प्रवासी भारमान अधिक असते. मात्र, मंदिर बंद असल्याने भाविकांनी आपले नियोजन पुढे ढकलले असून एसटी बससेवेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. पुढील तीन महिने हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता असल्याने एसटी महामंडळासमोर आर्थिक अडचणी उभ्या राहण्याची चिन्हे आहेत. मंदिर पुन्हा सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्या वाढेल, अशी अपेक्षा एसटी प्रशासनाने व्यक्त केली आहे. “भीमाशंकर मंदिर बंद असल्याने प्रवासी संख्येत मोठी घट झाली आहे. आधी प्रत्येक बसमध्ये पन्नासपेक्षा जास्त भाविक असायचे, आता ती संख्या पंचवीसच्या आसपास आली असून त्यामुळे एसटीच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे.” – साधना कालेकर,वाहतूक निरीक्षक, मंचर एसटी आगार.