Satara Traffic Jam: अनधिकृत थांबेच वाहतूक कोंडीचे ‘हॉटस्पॉट’! रस्त्यांवर रिक्षांची रांग; वाहतूक विभागाचा गृहपाठ सुरु
Satara Traffic Jam: वाहतूक विभागाकडून चौक आणि संवेदनशील ठिकाणांचा अभ्यास सुरू; समस्येवर कायमस्वरूपी तोडग्याची अपेक्षा.

Satara Traffic Jam – शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना रस्त्याकडेला, चौकांच्या तोंडावर आणि वर्दळीच्या ठिकाणी थांबणाऱ्या रिक्षा हा कोंडीचा प्रमुख घटक ठरत आहे. शहरातील अनेक ठिकाणी अधिकृत थांब्यांऐवजी रिक्षाचालकांनी सोयीच्या ठिकाणी ‘अनधिकृत थांबे’ निर्माण केले असून, प्रवासी मिळविण्यासाठी रस्त्यावरच रिक्षांची रांग लागते. परिणामी वाहनचालक, पादचारी आणि नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
शहरातील राजवाडा परिसर, सातारा एसटी बस स्थानक परिसर, पोवई नाका, विसावा नाका, गोलबाग परिसर, तांदूळ आळी तसेच आळूचा खड्डा परिसरात रिक्षांची अनियंत्रित थांबणी हा वाहतुकीसाठी मोठा अडथळा ठरत असल्याचे निदर्शनास आले. काही ठिकाणी रिक्षा रस्त्याच्या कडेला उभ्या राहत असल्याने उपलब्ध रस्त्याची रुंदी कमी होते. त्यातच प्रवासी चढ-उतारासाठी रिक्षा अचानक थांबल्याने मागून येणाऱ्या वाहनांना ब्रेक लावावा लागतो आणि वाहतुकीची गती मंदावते.
विशेषतः राजवाडा आणि एसटी बस स्थानक परिसरात प्रवाशांची मोठी वर्दळ असल्याने रिक्षांची संख्या वाढते. पोवई नाका आणि विसावा नाका यांसारख्या महत्त्वाच्या चौकांमध्ये काही मिनिटांसाठी रिक्षा थांबली तरी त्याचा परिणाम मागील वाहतुकीवर होतो. गोल बाग, तांदूळ आळी आणि आळूचा खड्डा परिसरातही रस्त्याची उपलब्ध जागा आणि वाहनांची संख्या यांचा ताळमेळ नसल्याने कोंडीची समस्या निर्माण होते.
वाहतूक विभागाचा ‘गृहपाठ’ सुरू
शहरातील वाहतूक कोंडीचे मूळ कारण शोधण्यासाठी वाहतूक विभागाकडून विविध भागांचा अभ्यास, वाहतुकीचे स्वरुप, रिक्षांचे थांबे, प्रवासी चढ- उताराची ठिकाणे आणि संवेदनशील चौक यांचा गृहपाठ सुरू असल्याची माहिती आहे. मात्र, केवळ कारवाई करून प्रश्न सुटणार नसून शहरासाठी शास्त्रीय पद्धतीने रिक्षा थांबे निश्चित करण्याची आवश्यकता आहे.
वाहतूक कोंडीचे समीकरण नेमके कुठे?
शहरातील समस्या केवळ रिक्षांपुरती मर्यादित नाही. रिक्षांसोबत दुचाकी- चारचाकींचे बेकायदा पार्किंग, दुकानांसमोरील अडथळे, मालवाहू वाहनांचे थांबणे आणि प्रवाशांच्या चढ-उतारासाठी रस्त्यावर होणारा वापर यामुळे परिस्थिती आणखी बिकट होते. राजपथ व राधिका रस्त्यावरील मार्केट यार्ड परिसरामध्ये उभे राहणारे मालवाहू ट्रक यामुळे वाहतुकीची कोंडी होते. बारटक्के कॉर्नर ते महाराणा प्रताप चौक हा रस्ता तर अघोषित ट्रक टर्मिनस ठरला आहे.
शाहू स्टेडियम परिसरात उभ्या राहणाऱ्या खासगी लक्झरी यासुद्धा वाहतूक कोंडीचे कारण ठरत आहेत. त्यामुळे वाहतूक विभागाने संबंधित सर्व घटकांचा एकत्रित अभ्यास करण्याची गरज आहे. शहरातील प्रत्येक महत्त्वाच्या चौकासाठी ‘नो- स्टॉपिंग झोन’, अधिकृत रिक्षा थांबा आणि पार्किंग झोन निश्चित झाले तर कोंडीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळविता येऊ शकते.






