Satara News | ‘एक खिडकी’ योजनेचा सातार्यात फज्जा? ; महावितरण, वाहतूक पोलीस पालिकेकडे फिरकेनात

प्रभात वृत्तसेवा
सातारा – गणेशोत्सव मंडळांना आवश्यक परवानग्या देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘एक खिडकी’ योजनेचा सातार्यात बोर्या वाजला आहे. पालिकेच्या कर्मचार्यांचा अपवाद वगळता, वाहतूक पोलीस, महावितरणचे कर्मचारी पालिकेकडे फिरकत नसल्याने पालिकेचा कमिटी हॉल मोकळा पडला आहे. त्यामुळे विविध परवानग्यांसाठी गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना त्रिस्थळी यात्रा करावी लागत आहे.गणेशोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी या गैरसुविधेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या समन्वय समितीच्या बैठकीत महावितरण, वाहतूक पोलीस, पोलीस ठाणे व सातारा पालिकेच्या सर्व परवानग्या एकाच छताखाली मिळण्यासाठी कमिटी हॉलमध्ये स्वतंत्र कक्ष सुरू केला जाईल, असे आश्वासन मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिले होते. त्यानुसार हा कक्ष सुरू करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये शहरातील 16 मंडळांनी ऑनलाइन परवानग्यांची प्रक्रिया पूर्ण केली आहे. मंडळांना मंडप परवाना, देखावे, ध्वनिवर्धक यंत्रणा, मंडपासाठी रस्त्यांवर खड्डे खोदणे, वीज कनेक्शन परवाना, अशा परवानग्या आवश्यक आहेत.
मात्र, पालिकेचे कर्मचारी वगळता, पोलीस आणि महावितरणचे कर्मचारी या कक्षाकडे अद्याप फिरकले नाहीत. त्यामुळे एक खिडकी योजना सध्या तरी कागदावरच आहे. शहरातील गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते परवानग्यांसाठी पालिकेत येत आहेत. मात्र, तेथे सर्व परवानग्या न मिळाल्याने, त्यांना त्रिस्थळी यात्रा करावी लागत आहे. याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.याबाबत पालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाचे निरीक्षक प्रशांत निकम म्हणाले, पोलिसांकडून परवाना मिळाल्यानंतर त्याची ऑनलाइन नोंदणी ‘माय सातारा’ अॅपवर कार्यकर्त्यांनी करायची आहे. त्यानंतर पालिकेकडून ऑनलाइन परवानगी लगेच दिली जात आहे.
मंडळांना विशिष्ट नमुन्यातील घोषणापत्र दिले जात आहे. हे पत्र त्यांनी सादर केल्याचर सर्व परवानग्यांची प्रक्रिया पूर्ण होत आहे. मात्र, मंडळांना किती दराने वीज द्यायची याचा घोळ कायम आहे. फॉर्म सबमिट करताना तांत्रिक अडचणी येत असल्याच्या मंडळांच्या तक्रारी येत आहेत. कमिटी हॉलमध्ये पालिकेने सर्व तयारी करून ठेवली असली, तरी हा कक्ष रिकामा आहे. त्यामुळे ‘एक खिडकी’ योजनेला हरताळ फासला गेला आहे.





