Satara News: साताऱ्यातील ५ तालुके दुष्काळाच्या यादीतून बाहेर का? राष्ट्रीय मराठा महासंघ आक्रमक
Satara News: विहिरी आटल्या, शेतीचा प्रश्न गंभीर; शासनाने कागदी निकषांऐवजी प्रत्यक्ष परिस्थिती पाहून संपूर्ण सातारा जिल्हा सरसकट दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी.

Satara News- पाण्याची पातळी खालावली, विहिरी आटू लागल्या, शेतीसमोर संकट उभे राहिले; मात्र दुष्काळाच्या झळा सहन करणार्या सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यांनाच मदतीच्या यादीत स्थान मिळाले आहे. त्यामुळे ‘दुष्काळाला तालुक्यांच्या सीमा नसतात, मग मदतीलाही सीमा का?’ असा सवाल करीत राष्ट्रीय मराठा महासंघाने संपूर्ण सातारा जिल्हा सरसकट दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
युवक जिल्हाध्यक्ष अतुल शिंदे यांनी निवेदन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष विक्रम वाघ, विक्रम आवळे, नंदिनी गायकवाड, कलावती चव्हाण, सिताराम नवघणे, अधिकराव सावंत, वैभव जाधव, विक्रम मोरे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, शासनाने जिल्ह्यातील 11 तालुक्यांपैकी सातारा, खटाव, माण, फलटण, खंडाळा आणि महाबळेश्वर या सहा तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित केले आहे.
मात्र कराड, वाई, कोरेगाव, पाटण आणि जावळी या पाच तालुक्यांमध्येही पर्जन्यमानाची मोठी तूट आहे. अनेक भागांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असून सिंचन व्यवस्था, पाणीसाठे, नद्या-नाले आणि विहिरींच्या पाणीपातळीवर त्याचा परिणाम जाणवत आहे. दुष्काळाची तीव्रता कागदावरील तालुकानिहाय निकषांनी ठरवू नये; प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार करून संपूर्ण जिल्ह्याला समान निकषाने मदत द्यावी, अशी भूमिका महासंघाने मांडली.
शेतकर्यांना आर्थिक मदत, पशुधनासाठी चारा व सहाय्य, बियाणे-खतांवर अनुदान, वीज बिलात सवलत, कर्जमाफी तसेच शासनाच्या अन्य दुष्काळी सवलती सर्व 11 तालुक्यांना लागू करावा, संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने तातडीने शासनाकडे पाठवावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.





