Satara News : तर्कतीर्थांच्या विशेष पोस्ट पाकिटाचे उद्या वाईत प्रकाशन !

वाई – थोर विचारवंत, मराठी विश्वकोशाचे माजी अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची १२५ वी जयंती सोमवारी २७ जानेवारी रोजी राज्यभरात साजरी होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय डाक विभागाकडून तर्कतीर्थांच्या विशेष पोस्ट पाकिटाचे प्रकाशन केले जाणार आहे. या विशेष पोस्ट पाकिटामुळे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची एक वेगळी ओळख पोस्टाच्या माध्यमातून देशभरात पोहोचली जाणार आहे.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नावाचे विशेष पोस्ट पाकिटाचे प्रकाशन पुणे क्षेत्राचे पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांच्या प्रमुख उपस्थितीत वाईच्या स्वामी केवलानंद सरस्वती मंदिरात उद्या सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे.
यावेळी ‘तर्कतीर्थांच्या विचारांतील समकालीन प्रस्तुतता’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून, त्यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ पत्रकार व लेखक सारंग दर्शने विचार मांडणार आहेत, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राज्ञपाठशाळा मंडळाच्या अध्यक्ष डॉ. सरोजा भाटे आहेत.
यावेळी मंडळाचे सचिव अनिल जोशी, सहसचिव भालचंद्र मोने, मंडळातील इतर संचालक मंडळ आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती मंडळाचे सचिव अनिल जोशी यांनी दिली. दरम्यान, या सोहळ्याला राज्यभरातील साहित्यप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी आयोजकांनी केले आहे.





