Satara News: साताऱ्यात मियावाकी वनांचा यशस्वी प्रयोग! अवघ्या १० महिन्यांत उभी राहिली दाट हिरवाई
Satara News: कमी जागेत वेगाने घनवन उभारण्यासाठी मियावाकी तंत्रज्ञान ठरतेय प्रभावी; २०२६-२७ मध्ये आणखी १७.४० हेक्टरवर ५ लाख २२ हजार झाडे लावण्याचे वनविभागाचे नियोजन.

Satara News – वाढते नागरीकरण, औद्योगिकीकरण आणि त्यातून कमी होत जाणारे हरित क्षेत्र लक्षात घेऊन सातारा वनविभागाने मियावाकी पद्धतीने घनवन निर्मितीचा प्रयोग हाती घेतला आहे. ‘अटल आनंदवन घन प्रकल्पा’तंर्गत 2025-26 मध्ये 10 हेक्टर क्षेत्रावर तब्बल तीन लाख देशी वृक्षप्रजातींची लागवड करण्यात आली.
विशेष म्हणजे लागवडीनंतर अवघ्या आठ ते दहा महिन्यांत रोपांची सात ते आठ फुटांपर्यंत वाढ झाल्याने या भागात दाट हिरवाईचे स्वरूप दिसू लागले आहे. मियावाकी पद्धतीत कमी जागेत मोठ्या प्रमाणावर स्थानिक प्रजातींची लागवड केली जाते. लागवडीपूर्वी मातीमध्ये सेंद्रिय घटक मिसळून तिची सुपीकता वाढविली जाते. त्यानंतर विविध उंचीच्या देशी वृक्षप्रजातींची दाट लागवड करून जमिनीवर पालापाचोळा किंवा अन्य नैसर्गिक आच्छादन केले जाते.
सुरुवातीच्या काळात नियमित सिंचन आणि देखभाल केल्यानंतर रोपांची वाढ तुलनेने वेगाने होण्यास मदत होते. पहिल्या टप्प्यातील प्रयोगाला मिळालेल्या प्रतिसादानंतर वनविभागाने प्रकल्पाचा विस्तार करण्याचे नियोजन केले आहे. 2026-27 मध्ये राज्य योजनेअंतर्गत आणखी 17.40 हेक्टर क्षेत्रावर 5 लाख 22 हजार वृक्षांची लागवड करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे घनवनाचा विस्तार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.
हरित क्षेत्र वाढविण्यावर भर…
दाट रोपवनामुळे परिसरात पक्षी, फुलपाखरे, मधमाश्या आणि अन्य लहान जीवांना अधिवास उपलब्ध होण्यास मदत होऊ शकते. तसेच कार्बन शोषण, धूळ व ध्वनी प्रदूषण नियंत्रण आणि स्थानिक तापमान संतुलित ठेवण्यासाठी या हरित पट्ट्यांचा उपयोग होऊ शकतो. मियावाकी पद्धतीतील घन लागवडीमुळे कमी क्षेत्रात मोठ्या संख्येने देशी वृक्ष वाढविण्याचा प्रयत्न आहे. पुढील टप्प्यात प्रकल्पाचा विस्तार करून हरित क्षेत्र वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.
– अमोल सातपुते, उपवनसंरक्षक, सातारा





