Green Cover Pune: १०८ कोटींचा धुरळा! पण हरित पुणे अवघे १० टक्के; महापालिकेचा कारभार चव्हाट्यावर
Green Cover Pune: १० वर्षांत तोडलेली झाडे आणि पुनरोपणाची आकडेवारी गायब; प्रशासनाने उत्तर न देता चेंडू फेकला क्षेत्रीय कार्यालयांच्या कोर्टात.

Green Cover Pune – महापालिकेने शहरातील उद्याने हिरवीगार ठेवण्यासाठी गेल्या पाच वर्षांत तब्बल १०८ कोटी ४६ लाख रुपये खर्च केले. मात्र, पुणे शहराच्या जुन्या हद्दीतील २४९ चौ.कि.मी. क्षेत्राच्या वृक्षगणनेत केवळ २५.१० चौ.कि.मी. म्हणजेच अवघे १० टक्के क्षेत्र ग्रीन कव्हर असल्याचे समोर आले आहे. उद्यानांच्या देखभालीवर कोट्यवधींचा खर्च सुरू असताना दुसरीकडे शहराचे एकूण हरित आच्छादन दहा टक्क्यांवरच असल्याचे वास्तव आहे.
काँग्रेसचे गटनेते अॅड. चंदूशेठ कदम यांनी ऑगस्ट महिन्याच्या मुख्यसभेसाठी विचारलेल्या प्रश्नावर प्रशासनाने दिलेल्या उत्तरातून ही माहिती समोर आली आहे. पुणे शहराचा विस्तार, वाढते बांधकाम, रस्ते रुंदीकरण आणि वेगाने होणारे काँक्रिटीकरण पाहता ग्रीन कव्हरचे हे प्रमाण चिंता वाढविणारे आहे.
मात्र, शहराचे ग्रीन कव्हर वाढविण्यासाठी केवळ उद्याने पुरेशी नाहीत. महापालिकेच्या मोकळ्या जागा, टेकड्या, उद्यानांसाठी आरक्षित जागा, रस्त्यांकडेला असलेले हरित पट्टे आणि नैसर्गिक वृक्षाच्छादित क्षेत्रांचे संरक्षण करणेही तितकेच आवश्यक असल्याने महापालिकेने त्याकडेही गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
पाच वर्षात १०८ कोटींचा खर्च
महापालिकेच्या उद्यान विभागाने शहरात २१५ उद्याने विकसित केली आहेत. या उद्यानांचे एकूण क्षेत्रफळ २४ लाख ५३ हजार ५७३ चौ.मी. आहे. या उद्यानांच्या देखभाल-दुरुस्तीवर मोठा निधी खर्च होत आहे. २०२१-२२ मध्ये १४ कोटी ३८ लाख १६ हजार रुपये, २०२२-२३ मध्ये ३२ कोटी २२ लाख ४२ हजार रुपये, २०२३-२४ मध्ये १६ कोटी ५४ लाख २० हजार रुपये,
२०२४-२५ मध्ये २० कोटी ३२ लाख ३४ हजार रुपये आणि २०२५-२६ मध्ये २४ कोटी ९९ लाख २८ हजार रुपये खर्च करण्यात आले. पाच वर्षांचा हा खर्च १०८ कोटी ४६ लाख ४० हजार रुपये झाला आहे. उद्यानांच्या देखभालीवर किती खर्च झाला, यापेक्षा त्यातून शहराच्या हरित क्षेत्रात किती भर पडली, हा महत्वाचा प्रश्न आहे.
वृक्षतोडीनंतर किती झाडे लावली
महापालिकेने गेल्या १० वर्षांत किती वृक्षतोडीस परवानगी दिली, किती वृक्ष तोडण्यात आले, त्यानंतर किती वृक्ष लावले, लावलेल्या वृक्षांपैकी किती वृक्ष जिवंत आहेत, याची आकडेवारीच प्रशासनाकडे नाही. ही माहिती क्षेत्रीय कार्यालयांकडे असल्याचे सांगत प्रशासनाने क्षेत्रीय कार्यालयांना पत्र पाठविले.
मात्र, त्यातील केवळ सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत २६६ वृक्ष काढण्याची परवानगी देण्यात आली होती. त्याबदल्यात १,०६६ नवीन वृक्ष लावल्याची माहिती प्रशासनाकडे आहे. मात्र, यातील किती वाढले, किती वृक्षांची देखभाल केली जात आहे, याची माहिती प्रशासनाच्या उत्तरात देण्यात आलेली नाही.






