Satara News : शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी जयवंतराव शेलार यांची निवड

कोयनानगर – शिवसेनेचे (शिंदे) ज्येष्ठ जयवंतराव उर्फ माऊली शेलार यांची शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी फेरनिवड करण्यात आली आहे. राज्याचे पर्यटनमंत्री आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ही घोषणा केली. या निवडीनंतरजिल्हाभरातील शिवसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण असून विविध भागांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
जयवंतराव शेलार गेली दोन दशके जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय असून शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. कोयनानगरसारख्या भागापासून ते जिल्हा मुख्यालयापर्यंत कार्यकर्त्यांशी असलेला त्यांचा संवाद, प्रत्येक कार्यकर्त्याची दु:खं, गाऱ्हाणी ऐकण्याची तळमळ आणि गावपातळीवर पक्षाला मजबुती देण्याची वृत्ती यामुळे ते पक्षांतर्गत आणि लोकांमध्येही प्रिय आहेत.
या निवडीबद्दल शंभूराज देसाई म्हणाले, ‘‘शिवसेनेच्या विचारांची खरी ओळख जयवंतराव शेलार आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे जिल्ह्यातील शिवसेना संघटना आणखी सक्षम होईल. पक्षाचा पाया गावपातळीवर मजबूत करण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरेल.’’
ही जबाबदारी सन्मानाची असली तरी ती अधिक मोठ्या कामाची आठवण करून देते. पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दाखवलेला विश्वास कृतीतून सिद्ध करीन. कोयनानगरसह संपूर्ण जिल्ह्यातील शिवसैनिक हेच माझं बळ आहे. त्यांच्या पाठबळावरच संघटनेचे काम पुढे न्यायचं आहे. कार्यकर्त्यांचे प्रश्न माझेच प्रश्न आहेत. त्यांची साथ हीच माझी प्रेरणा आहे.
– जयवंतराव शेलार (नवनियुक्त जिल्हाप्रमुख, शिवसेना)





