Satara News: नाव मतदार यादीत आहे का? निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, आता ‘या’ तारखेपर्यंत करता येणार बदल
Satara News: १६ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार अंतिम मतदार यादी; बीएलओ (BLO) आणि तहसील कार्यालयात नावाची खात्री करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन.

Satara News- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सातारा जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण सुरू आहे. या प्रक्रियेअंतर्गत मतदार यादीतील दावे व हरकती दाखल करण्याची मुदत 26 ऑक्टोबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाने 12 ऑक्टोबर 2026 रोजी जारी केलेल्या पत्रानुसार पुनरीक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
सुधारित कार्यक्रमानुसार, दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी 31 ऑगस्ट ते 26 ऑक्टोबर असा आहे. नोटीस कालावधी आणि दावे-हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया 31 ऑगस्ट ते 10 नोव्हेंबर या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर 16 नोव्हेंबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व मतदारांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
प्रारूप मतदार याद्या उपविभागीय अधिकारी कार्यालये, तहसील कार्यालये तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे तपासणीसाठी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचे संकेतस्थळ, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र आणि भारत निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ येथेही मतदार यादी तपासता येईल. प्रारूप मतदार यादीत नाव नसल्यास किंवा नाव,
पत्ता अथवा अन्य तपशिलात दुरुस्ती आवश्यक असल्यास संबंधित मतदारांनी 26 ऑक्टोबर 2026 पूर्वी आपल्या मतदान केंद्राच्या बीएलओशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पात्र मतदाराचे नाव यादीतून वगळले जाणार नाही आणि अपात्र व्यक्तीचे नाव मतदार यादीत समाविष्ट होणार नाही, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन संतोष पाटील जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, सातारा यांनी केले आहे.





