Farmer Protest Pune: ‘जमिनी आमच्या नावावर करा!’ जिल्हाधिकारी कार्यालयावर ८ तालुक्यांतील शेतकाऱ्यांचा धडक मोर्चा
Farmer Protest Pune: देवस्थान इनाम वर्ग-३ व वक्फ बोर्डाच्या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना मालकी हक्क मिळण्यासाठी किसान सभेचा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा.

Farmer Protest Pune- देवस्थान इनाम वर्ग-3च्या जमिनी कसणार्या शेतकर्यांच्या नावावर कराव्यात, तसेच देवस्थान वक्फ बोर्डाचे नाव कमी करून वर्षानुवर्षे जमीन कसणार्या शेतकर्यांना मालकी हक्क मिळावा, या प्रमुख मागणीसाठी किसान सभा व देवस्थान इनाम वर्ग-3 शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर, दौंड, शिरूर, जुन्नर, आंबेगाव, खेड आणि मावळ या आठ तालुक्यांतील शेकडो शेतकरी सहभागी झाले.
देवस्थान इनाम वर्ग-3च्या जमिनींच्या प्रश्नावर राज्य शासनाने कायदा करून जमीन कसणार्या शेतकर्यांना मालकी हक्क देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच यासाठी कायदा करण्याकरिता स्थापन होणार्या समितीत किसान सभेचे चार सदस्य घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, या आश्वासनांची अद्याप पूर्तता झालेली नसल्याने ती तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी ज्येष्ठ कामगार नेते प्रा. अजित अभ्यंकर, किसान सभेचे राज्याध्यक्ष उमेश देशमुख,
राज्य सहसचिव डॉ. अमोल वाघमारे, राज्य समितीचे सदस्य गुलाबभाई मुलाणी आणि एसएफआयचे नवनाथ मोरे यांनी मोर्चेकर्यांना संबोधित केले. शिष्टमंडळाचे निवेदन विशेष कार्यकारी दंडाधिकारी बाळासाहेब शीरसाठ यांनी स्वीकारले. जिल्हाधिकार्यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व आसिफ शेख, अमोद गरुड, राजू घोडे, इम्रान इनामदार, जुनेद मुलानी, अल्लीभाई सय्यद, नवनाथ भोंगळे, विजय चव्हळे, खुशरू मुजावर आणि अमिनुद्दीन मुजावर यांनी केले.





