Pune District : विधानसभा निवडणुकीतील पराभव कृत्रिम; संजय राऊतांचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
Pune District : मतदार याद्यांमधील कथित फेरफार आणि विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेच्या माध्यमातून विरोधी पक्षांना मतदान करणार्या भागांतील मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

नारायणगाव : विधानसभा 2024 च्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा झालेला पराभव हा कृत्रिम असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या त्रिकुटाने हा पराभव घडवून आणल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या संघटनात्मक दौर्यादरम्यान नारायणगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी राऊत यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखपदी किरण तावडे यांच्या नियुक्तीची घोषणा केली. या वेळी शिवसेनेचे उपनेते संजय सावंत, बबनराव थोरात, तालुकाप्रमुख भास्कर गाडगे, सहसंपर्कप्रमुख दिलीप बाम्हणे, दीपमाला बढे, ड. जयराम तांबे, दिलीप डुंबरे, आनंद रासकर, जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका करताना राऊत म्हणाले की, देशात आणि महाराष्ट्रात राजकीय वातावरण बदलत असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे कार्यकर्त्यांची ताकद आणि जिद्द आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून पक्षाला न्याय मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
मतदार याद्यांमधील कथित फेरफार आणि विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेच्या माध्यमातून विरोधी पक्षांना मतदान करणार्या भागांतील मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जनतेच्या प्रश्नांवर पुरेसे बोलत नसल्याची टीका करताना राज्यातील दुष्काळ आणि अन्य समस्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचेही ते म्हणाले.
नीट, एमपीएससीवरून सरकारला लक्ष्य
न्यायव्यवस्थेत राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत राऊत यांनी न्यायव्यवस्थेच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित केले. नीट आणि एमपीएससी परीक्षांमधील कथित घोटाळ्यांमुळे तरुणांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. केवळ न्यायालयाच्या आदेशाने हे प्रश्न सुटणार नाहीत; सरकारने विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेऊन तातडीने मार्ग काढावा, असे ते म्हणाले. या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट सकारात्मक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
50 खासदारांच्या स्वाक्षर्यांसह प्रस्ताव
मतदारयादीतील कथित फेरफार आणि एसआयआर प्रक्रियेतील गैरव्यवहारांविरोधात 50 खासदारांच्या स्वाक्षर्यांसह मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोगाचा कायदेशीर प्रस्ताव दिला होता; मात्र राज्यसभेच्या सभापतींनी तो फेटाळल्याचे राऊत यांनी सांगितले. संसदेत विरोधी पक्षांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप करत आगामी अधिवेशनात कामकाज सुरळीत चालण्याबाबतही त्यांनी शंका व्यक्त केली.
किरण तावडे यांच्यावर नवी जबाबदारी
शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या संघटनात्मक दौर्यादरम्यान खासदार संजय राऊत यांनी किरण तावडे यांची मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखपदी नियुक्ती जाहीर केली. यावेळी शिवसेनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.





