Satara News: ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी ऐतिहासिक निर्णय! अंगणवाडीच्या वेळेत झाला मोठा बदल
Satara News: दलित महिला विकास मंडळ अन् जिल्हा परिषदेचा पुढाकार; आयसीडीएस आयुक्तांकडून धोरणात्मक निर्णयावर शिक्कामोर्तब.

Satara News – ऊसतोड कामगारांच्या मुलांना लसीकरण व पोषण आहाराचा लाभ नियमित मिळावा, यासाठी दलित महिला विकास मंडळाने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून शासनाने धोरणात्मक निर्णय घेत अंगणवाडीची वेळ दुपारी 12 ते सायंकाळी 6.30 अशी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे साखर कारखान्यांच्या परिसरात वास्तव्यास असलेल्या ऊसतोड कामगारांच्या हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.
याबाबतची माहिती दलित विकास महामंडळाच्या प्रमुख अॅड. वर्षा देशपांडे व प्रकल्पप्रमुख सिंधू ठोंबरे यांनी दिली आहे. दलित महिला विकास मंडळाच्यावतीने गेल्या वर्षभरापासून सातारा जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांच्या परिसरात फिरते कायदा सल्ला केंद्र राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जरंडेश्वर साखर कारखान्याच्या परिसरात बैलगाडीतून ऊस वाहतूक करणार्या कामगारांच्या वस्त्यांवर सर्वेक्षण करण्यात आले.
सुमारे 500 कुटुंबांच्या सर्वेक्षणात शून्य ते सहा वयोगटातील 35 बालके अंगणवाडीच्या सेवा, लसीकरण आणि पूरक पोषण आहारापासून वंचित राहत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. याबाबत सखोल चौकशी केली असता अंगणवाडीची सकाळची वेळ आणि ऊस वाहतूक करणार्या कामगारांच्या दैनंदिन कामाचे वेळापत्रक यामध्ये मोठी विसंगती असल्याचे स्पष्ट झाले.
बैलगाडी चालक व कामगार पहाटे सुमारे तीन वाजता घराबाहेर पडत असून दुपारी साडेबारा वाजल्यानंतरच कारखाना परिसरात परत येतात. त्यामुळे सकाळी साडेनऊच्या सुमारास मुलांना अंगणवाडीत नेणे पालकांना शक्य होत नव्हते. परिणामी अनेक बालके शासनाच्या महत्त्वाच्या योजनांपासून वंचित राहत होती. ही गंभीर बाब लक्षात आल्यानंतर दलित महिला विकास मंडळाच्या पदाधिकार्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन तसेच एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकार्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
त्यानंतर हा प्रस्ताव आयसीडीएस आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्याचा सल्ला देण्यात आला. जिल्हा परिषदेनेही या मागणीचा पाठपुरावा केला. या निर्णयाबद्दल ऊसतोड कामगारांनी समाधान व्यक्त केले असून, मुलांच्या आरोग्य व पोषणाच्या प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पाहत धोरणात बदल घडवून आणल्याबद्दल दलित महिला विकास मंडळाचे आभार मानले आहेत.






