Satara News : आमदार संजय गायकवाड यांच्या धमकीला चोख प्रत्युत्तर; ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे भरचौकात वाचन
Satara News : शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाला धमकावल्याचा निषेध; अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी साताऱ्यातील विविध संघटना एकवटल्या.

Satara News – बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या घटनेच्या निषेधार्थ साताऱ्यात आंदोलन करण्यात आले. येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी विविध पुरोगामी संघटनांच्यावतीने एकत्र येत पुस्तकाचे जाहीर वाचन करून आमदार गायकवाड यांचा निषेध नोंदविण्यात आला.
या वेळी आंदोलकांनी ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटू नका,’ अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला. ‘शिवाजी कोण होता’ या कॉ. गोविंद पानसरे लिखित पुस्तकाचे प्रकट वाचन लेक लाडकी अभियानाच्या अॅड. वर्षा देशपांडे यांनी केले. या वाचनातून शिवाजी महाराजांच्या विचारांचा व्यापक आणि लोकाभिमुख दृष्टिकोन अधोरेखित करण्यात आला. आंदोलनात सहभागी झालेल्या वक्त्यांनी आमदार संजय गायकवाड यांनी वापरलेल्या भाषेचा आणि दिलेल्या धमक्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला.
लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वागणे अपेक्षित असताना अशा प्रकारची वक्तव्ये लोकशाही मूल्यांना धक्का देणारी असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रशांत आंबी यांना पोलीस संरक्षण द्यावे तसेच आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात विमा कामगार संघटनेचे वसंत नलावडे, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे विजय मांडके, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे गणेश भिसे, काँग्रेसचे सादिक बागवान, शहीद भगतसिंग स्मृती समितीचे जंगम,
कॉ. सर्जेराव भुजबळ, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे माणिक अवघडे, आनंदी अवघडे, सीटूचे कॉ. सलीम आतार, प्रमोद परामणे, राष्ट्र सेवा दलाचे प्रा. आनंद साठे, राज्यघटना जागृती मोहिमेचे भगवान अवघडे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उदय चव्हाण, परिवर्तनवादी संघटना समन्वय समितीचे मीनाज सय्यद यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि वैचारिक मतभिन्नतेचा आदर राखण्याचे आवाहन यावेळी उपस्थितांनी केले. अशा धमकीच्या घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली.





