Eknath Shinde: शेतकऱ्यांबद्दल बेतला विधान केल्याने एकनाथ शिंदे आमदारावर संतापले; थेट निलंबनाची कारवाई होणार?
Eknath Shinde: आमदारावर पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली

Eknath Shinde: शिवसेना आमदार संजय गायकवाड नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. अलीकडेच शेतकऱ्यांबाबत बोलताना त्यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. यातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करणार असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीद्वारे समोर आली आहे.
शेतकरी आपला अन्नदाता असून त्याच्याविरोधातील कोणतीही विधाने खपवून घेतली जाणार नाहीत, अशी तंबी शिंदेंनी दिली आहे. तसेच संजय गायकवाड यांच्यावर शिवसेना पक्षातून निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती आहे.
शिवसेनेची शेतकऱ्यांसाठी मदत
दरम्यान, एकीकडे शिवसेनेने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मदत मोहीम सुरू केली आहे. शेतकरी कुटुंबांतील लाडक्या बहिणींना 25 हजार शिलाई मशिन्सचे वाटप केले जात आहे.
दसरा मेळाव्यात शिवसेनेने 100 ट्रक अन्नधान्य दुष्काळग्रस्त भागात पाठवले आहे. शिवसेना पक्ष शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठोस काम करत असताना संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानामुळे शिवसेनेची प्रतिमा मलीन होत असल्याचे पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनी म्हंटले आहे.
संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले होते?
बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शेतकरी आत्महत्या विषयावर भाष्य केलं होतं. “शेतकरी कुटुंबाला वाऱ्यावर सोडून आत्महत्या करतो. त्याला काही अडचण असेल तर त्याने आमदार, खासदार यांना चिठ्ठी लिहावी. आम्ही सर्व मिळून त्याची मदत करू,” असा सल्ला आमदार संजय गायकवाड यांनी दिला.
पुढे ते म्हणाले, “शेतकरी कुठल्याही विचार न करता आत्महत्या करतात. त्यामुळे त्यांच्या मौतीवरही कुणी जाऊ नये. जेव्हा शेतकऱ्याच्या मयतीला कोणी जाणार नाही आणि त्याची बॉडी जनावरे खातील तेव्हा शेतकऱ्यांच्या लक्षात येईल आणि तो आत्महत्या करणार नाही. शेतकऱ्याने आपल्या कुटुंबाची साथ द्यावी असं मध्येच सोडून जाऊ नये,” असे संजय गायकवाड यांनी म्हटले होते.
संजय गायकवाड अनेकदा सापडले वादात
दरम्यान, संजय गायकवाड अनेकदा वादात सापडले आहेत. कॅन्टिनमधील हाणामारी, शिवाजी कोण होता? पुस्तकाच्या प्रकाशकांना अत्यंत गलिच्छ शब्दात शिवीगाळ या प्रकारामुळे ते वादात सापडले आहेत. पण शेतकऱ्यांवर असं गलिच्छ वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली. यावरूनच आता त्यांच्यावर काय कारवाई केली जाणार हे पाहावे लागेल.
हेही वाचा:






