कोयनानगर : राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या पाटणकर गटाची पकड दिवसेंदिवस सैल होत चालली आहे. विकासाच्या प्रवाहापासून कोसो दूर राहिल्याने सुतारवाडी व काडोली येथील ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी अखेर पाटणकर गटाला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे पाटण तालुक्यात मोठी राजकीय खळबळ झाली असून पाटणकर गटाला धक्का बसल्याची चर्चा सुरू आहे. या प्रवेश सोहळ्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी उपस्थित राहून सर्वांचे शिवबंधन बांधून स्वागत केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, माजी सरपंच शैलेंद्र शेलार, सदस्य महादेव येडगे, हरीश सुतार यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. संपूर्ण परिसर घोषणाबाजीने दणाणून गेला होता. कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह होता. ग्रामस्थांच्या या निर्णयामुळे शिवसेनेत आनंदाचे वातावरण असून, पाटण तालुक्यातील आगामी राजकीय समीकरणांवर याचा मोठा प्रभाव पडणार असे मानले जात आहे.