Satara News : जिल्ह्यात लंपी स्किनने २० जनावरांचा मृत्यू; ३९३ जनावरे बाधित

सातारा : सातारा जिल्ह्यात लंपी स्किनने पुन्हा एकदा डोके वर काढले असून एका महिन्यात २० जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ३९३ जनावरे बाधित आढळली असून २०१ जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत. सध्या १६९ जनावरांवर उपचार सुरु असून पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून गोट पॉक्स लंपी चर्मरोग लसीकरण करण्यात येत आहे.
सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तुरळक प्रमाणात लंपी स्किन चर्मरोगाची जनावरे आढळून आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने युध्दपातळीवर पावले उचलत लसीकरण मोहिमेला गती दिली. लंपी स्किनने जिल्ह्यात ३९३ जनावरे बाधित आढळून आली असून पशुसंवर्धन विभागाने गतीने उपचार केल्यानंतर २०१ जनावरे बरी झाली आहेत.
२० जनावरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून सध्या सातारा ३२, पाटण २, माण ५५, कोरेगाव ३२, खटाव २६, खंडाळा १, कराड २१ अशी १६९ जनावरे बाधित आहेत. सर्व पशुधन विकास अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत समिती यांचा आढावा घेऊन लंपी चर्मरोग लसीकरण करण्याबाबत सूचना देवून विविध उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार यांनी दिली.
जिल्ह्यात लंपी चर्मरोग रोगाचा वाढता प्रादुर्भाव बघता जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून जिल्हा परिषद सेस लसपुरवठा करणे या योजनेअंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली गोट पॉक्स लंपी चर्मरोग लसीचा जिल्ह्यात पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होत आहे. पशुपालकांचे होणारे नुकसान टाळण्यास मदत झाली आहे.
– डॉ. विनोद पवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी




